- नानासाहेब कांडलकरजळगाव जामोद : जिल्ह्यात सर्वाधिक 159.4 मिमी पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून सर्वात कमी ७.१ मिमी पाऊस शेगाव तालुक्यात झाला आहे. जळगाव जामोद तालुक्यात सुद्धा 16 जून पर्यंत फक्त १७.६ मिमी पाऊस झाला असून ज्या शेतकऱ्यांनी पाऊस येईलच या आशेने पेरणीची घाई केली त्यांची पेरणी उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव जामोद उपविभागात जळगाव व संग्रामपूर हे दोन तालुके येतात जळगाव तालुक्यात केवळ 17.6 मिमी पाऊस झाला असताना संग्रामपूर तालुक्यात चक्क 94.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे .याचा अर्थ वरून राजाचा असमतोल किती मोठा आहे हे लक्षात येते. जिल्ह्यात घाटावरील सहा तालुक्यात वरुणराजाची मेहेरनजर चांगली असल्याचे दिसून येते. तर घाटाखालील सात तालुक्यात खामगाव व संग्रामपूर हे दोन तालुके सोडले तर इतर तालुक्यावर मात्र वरुणराजा रुसलेलाच दिसून येतो . 16 जून पर्यंत बुलढाणा तालुक्यात 43.8 मिमी ,चिखली तालुक्यात 126.4 मिमी, देऊळगाव राजा तालुक्यात 43.9 मिमी, सिंदखेडराजा तालुक्यात 115.2 मिमी,लोणार तालुक्या 70.4 मिमी तर मेहकर तालुक्यात सर्वाधिक 159.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर घाटाखालील खामगाव तालुक्यात 100.2 मिमी, शेगाव तालुक्यात फक्त 7.1 मिमी, मलकापूर तालुक्यात 25.2 मिमी, नांदुरा तालुक्यात 43.5 मिमी,मोताळा तालुक्यात 24.9मिमी, संग्रामपूर तालुक्यात 94.1मिमी तर जळगाव जामोद तालुक्यात 17.6 मिमी पाऊस झाला आहे. याचा अर्थ कृषी विभागाच्या निर्देशाप्रमाणे घाटाखालील खामगाव व संग्रामपूर या दोन तालुक्यातच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. इतर 5 तालुक्यात मात्र 75 ते 100 मिमी पाऊस न झाल्याने या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करणे धोक्याचे ठरणार आहे. घाटावरील चिखली, मेहकर, सिंदखेडराजा व लोणार या 4 तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला असून बुलढाणा व सिंदखेड राजा हे दोन तालुके मात्र 75 मिमी पेक्षा कमी पावसाचे असल्याने तिथे पेरणीयोग्य पाऊस नाही. लोणार तालुक्यात 17.4 पाऊस झाल्याने तेथे पेरणी उलटण्याची भीती कमी आहे .
जळगाव जामोद तालुक्यात फक्त १७.६ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 7:38 PM