लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात २९ जूनपर्यंत ३१.८२ टक्के पाणी असून, दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट होत आहे. यंदा पावसाळा सुरू होऊन तीन आठवड्याच्या वर कालावधी निघून गेला, तरीही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. आतापर्यंत धरण क्षेत्रात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २९ जून, २०२० रोजी धरणात तब्बल ४१ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणातील जलसाठ्यात १० टक्क्यांनी घट झाली. लवकर धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हनुमान सागर धरणावरून अकोला जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व खारपाणपट्ट्यातील संग्रामपूर व जळगाव तालुक्यातील १४० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. त्या जलसाठ्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात लवकर समाधानकारक पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यात कपातीची वेळ येऊ शकते. वान नदी पात्रात उभारण्यात आलेल्या हनुमान सागर धरणावर शेकडो गावांतील लाखो नागरिकांची तहान अवलंबून आहे. या धरणावर वीजनिर्मिती संच कार्यान्वित असून, त्या संचाची क्षमता १ हजार ५०० किलोवॅट आहे. दरवर्षी १ किलोवॅट वीजनिर्मिती येथे करण्यात येते. या वर्षी मात्र धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने वीजनिर्मिती संच बंदच आहे. मध्य प्रदेशातून उगम असलेली वान नदी सातपुडा पर्वत रांगेतून येत असल्याने, या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पाऊस पडल्यास, या धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होते. पावसाळा सुरू होऊन बराच कालावधी उलटून गेला, पाणलोट क्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणात पाण्याची आवक घटत आहे.
वान धरणात केवळ ३१ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 10:40 AM