- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाकडून देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या सानुग्रह अनुदानासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ ३३५ ऑटोरिक्षाचालक पात्र ठरले आहेत. इतर अर्ज विविध त्रुटींमुळे अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्रुटींची पूर्तता केल्यानंतर नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने शासनाने फेब्रुवारीच्या शेवटच्या टाळेबंदी जाहीर केली होती. यामुळे ऑटोरिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. या परिस्थितीतून सावरण्यासाठी राज्य शासनाने त्यांना १५०० रुपयांचे एक वेळचे अर्थसाहाय्य देण्याची योजना जाहीर केलेली आहे. या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला २२ मेपासून सुरुवात झाली असून, याकरिता ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ६४९ रिक्षाचालकांनी अर्ज केले आहेत. यापैकी ३३५ अर्ज पात्र, तर ३१४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्र लाभार्थींमध्ये परमिटची वैधता १६ डिसेंबर २०१५ पासून आजपर्यंत असलेले तर अपात्र असलेल्यांमध्ये लायसन क्रमांक, परमिट क्रमांकांचा उल्लेख नसलेले, आधार क्रमांक व लायसन क्रमांकावरील जन्मतारीख वेगवेगळी नमूद असलेल्या अर्जांचा समावेश आहे. असे अर्ज तात्पुरते अपात्र ठरविण्यात आले आहेत. याउलट खासगी वाहनधारक, मूळमालकाच्या नावाने नसलेेले, मालवाहू वाहनधारक व परमिटची वैधता संपलेले अर्ज कायस्वरूपी अपात्र ठरविण्यात आले आहेत. आतापर्यंत अर्ज न केलेल्या ऑटोरिक्षाचालकांनी ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
सानुग्रह अनुदानासाठी केवळ ३३५ ऑटोरिक्षाचालक पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 11:47 AM