अंढेरा: येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेत बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ २० हजार रुपये काढण्याची मर्यादा ठेवलेली आहे. यापेक्षा जास्त पैसे काढायचे असल्यास दुसऱ्या शाखेत खाते सुरू करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे बँकेतील ग्राहक अडचणीत सापडले आहेत.
अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना योग्य वागणूक दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यांच्या गैरकारभाराविरुद्ध जिल्हाधिकारी, लीड बँक बुलडाणा व विदर्भ कोकण ग्रामीण बँक मुख्य कार्यालय बुलडाणा यांच्याकडे ९ फेब्रुवारी रोजी विशाल वसंतराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. ग्राहकांना देण्यात येणारी वागणूक व बँक फुटेज व इतरही अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा अंढेरा येथे बँक व्यवस्थापकासह इतर कर्मचाऱ्यांकडून मनमानी नियम लावून ग्राहकांची कामे प्रलंबित ठेवली जात आहेत. ग्राहक बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता बँकेतून केवळ २० हजार रुपये मिळतात. २० हजार रुपयांच्यावर कॅश देण्यात येणार नाही, तसेच ग्राहकांना आरटीजीएस करून दुसऱ्या शाखेत तेथून पैसे काढावे, असे सांगितले जाते. कोविड - १९ च्या काळात ग्राहकांना या शाखेतून त्या शाखेत फिरवल्या जाते. जर ग्राहकाकडे दुसऱ्या बँकेत खाते नसल्यास एक लाख रुपये काढण्यासाठी वीस हजार रुपये प्रतिप्रमाणे पाच दिवस सतत शाखेत चकरा माराव्या लागतात. या प्रकारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.
--कोट--
विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा, अंढेरा ही ग्रामीण भागात येत असल्यामुळे केवळ वीस हजार रुपये ग्राहकांना देण्यात येतात. ज्यांना जास्त पैसे हवे असतील त्यांनी येथील खाते बंद करून दुसऱ्या शाखेत खाते उघडावे.
प्रशांत वडस्कर,
शाखा व्यवस्थापक,
ग्रामीण बँक शाखा अंढेरा
अंढेरा येथीला विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील व्यवस्थापक हे ग्राहकांना तसेच शेतकऱ्यांना नेहमीच नाहक त्रास देतात. शेतकऱ्यांकडून सक्तीने पीकविमा भरणा करून घेणाऱ्या व्यवस्थापकांची याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून, अशा मनमानी करणाऱ्या बँक व्यवस्थापकावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
सुभाष डोईफोडे, शिवसेना विभागप्रमुख, अंढेरा.