- सुहास वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क नांदुरा : खामगाव ते मलकापूर दरम्यान झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दशेबाबत सोशल मीडियावर अनेक संदेश व्हायरल होत आहेत. त्यामध्ये 'विमा काढला असेल तरच राष्ट्रीय महामार्गाने जा', डॉक्टरची अपॉइंटमेंट पहिलेच घ्या, नंतरच महामार्गाने जा, असे टीकात्मक मेसेज व्हायरल होत आहेत. यावरून या महामार्गाच्या दुर्दशेबद्दल नागरिक दिवसेंदिवस संतप्त होत असल्याचे दिसत आहे. मलकापूर ते खामगाव दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने या रस्त्यावर दररोज अपघात होण्यासोबतच वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेष म्हणजे, लोकमतने याविषयी वृत्त प्रकाशित केल्यानंतर खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ती बुजविण्यात आली. मात्र परतीच्या पावसामुळे त्या खड्डयामधील मुरूम वाहून गेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम बंद पडले. तेव्हापासून या रस्त्याच्या दुर्दशेला प्रारंभ झाला. खड्ड्यांमधे दुरुस्तीच्या नावाखाली केवळ चुरी टाकली जाते जी वाहनधारकांसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे.रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. अपघातात झाली आहे वाढ
दोन दिवसाआधीच चांदुर बिस्वा येथील जयेश संजय भागवत हे वडनेर जवळ चुरी टाकलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकीवरुन पडले. सोबत असलेली त्यांची आई रोडवर फेकल्या गेली. यावेळी त्यांच्या जवळूनच कंटेनर भरधाव गेला. अपघातात त्यांना जबर दुखापत झाली. तर याच खड्डयांमुळे नायगाव येथील संजय इंगळे यांच्या एकुलता एक तरूण मुलाचा अपघातात मृत्यू झाला.