प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी २ हजार ९३२ जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यापैकी २ हजार ९३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये बुलडाणा शहरातील शिवनेरीनगरमधील एक, देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा फाट्यावरील एकाचा समोश आहे. अन्य ११ तालुक्यांतील तपासणी करण्यात आलेल्या अहवालामध्ये एकही बाधित आढळून आलेला नाही. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. दरम्यान ८ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत तपासणीसाठी घेण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी ६ लाख १७ हजार ८४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ८६ हजार ५२० बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--१८२२ अहवालांची प्रतीक्षा
अद्यापही १ हजार ८२२ संदिग्धांचे अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त झालेले नाहीत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८७ हजार २०२ झाली आहे. यापैकी १६ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ६६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.
--रुग्णसंख्या घटली--
प्रदीर्घ कालावधीनंतर बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक अंकी आली आहे. मे २०२० च्या मध्यावर बुलडाणा जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नव्हता. त्यानंतर आता प्रथमच ही संख्या अवघ्या २ वर आली आहे. दुसरीकडे १८ जुलै रोजीचा पॉझिटिव्हिटी रेटही आतापर्यंतचा नीच्चांकी पातळीवरील रेट असून, तो अवघा ०.०७ टक्के आहे.