मंदिराच्या आजूबाजूला व संपूर्ण शेगाव शहरात धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून फार मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, ती बंद आहे. शासकीय नियमाप्रमाणे बाकी सर्व गोष्टी हळूहळू सुरू झाल्या आहेत. मंदिरे मात्र, भाविकांसाठी अद्यापही खुली झालेली नाहीत. कोरोनाबाबतचे बाकी सर्व नियम पाळून थोड्या प्रमाणात हळूहळू भाविकांना मंदिर प्रवेश खुला करण्याचा निर्णय शासनाने घेण्याची गरज आहे. नाही तर मंदिर बंद असल्यामुळे यावर अवलंबून असलेल्या सर्वच वर्गांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी शासनाने इतर वर्गाप्रमाणे आम्हालाही मदत करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.
किती दिवस कळसाचेच दर्शन?
आम्ही गुरुवारी आणि विशेष कार्यक्रमाच्या वेळी गजानन महाराज मंदिरात जातो. मात्र, मंदिरे बंद असल्याने दर्शनापासून वंचित आहोत. आमच्या ऊर्जेचा स्रोत, आमचे श्रद्धास्थान असल्याने, मंदिरात गेल्याने एक नवी प्रेरणा व शक्ती मिळते.
-राजेश काकडे, भाविक
शासनाने जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे ठरविले असताना बाकी सर्व गोष्टी हळूहळू सुरू होत आहेत. त्याप्रमाणे काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करीत थोड्या-थोड्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला पाहिजे.
-गजानन सवडतकर, भाविक
धार्मिक पर्यटन बंद, उलाढाल ठप्प
श्री संत गजानन महाराज मंदिर हे महत्त्वपूर्ण असल्याने येथे नेहमीच भाविकांची वर्दळ असते. मंदिराच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनातून फार मोठी उलाढाल होते. त्यामुळे मंदिरावर आधारित असलेल्या व्यावसायिकांचा उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे. यामुळे सर्वांनाच मंदिर उघडण्याची प्रतीक्षा आहे.
आर्थिक गणित कोलमडले
रसवंती हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे. शहरात पाच ठिकाणी आमची रसवंती केंद्र आहेत. मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांमुळे व्यवसाय तेजीत चालतो; परंतु कोरोनामुळे मंदिरे बंद असल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला. आता निर्बंध शिथिल झाले असले तरी सीझन संपल्याने खूप मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली.
-गजानन जवंजाळ, रसवंती व्यावसायिक, शेगाव
श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात माझे फोटो फ्रेमिंगचे दुकान आहे. मंदिर दर्शनासाठी खुले न झाल्यामुळे माझा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे घरखर्च चालविणेही मोठे कठीण होऊन बसले आहे. बाकी सर्व सुरू होत असताना मंदिरचं बंद ठेवणे योग्य नाही.
- प्रवीण मोरखडे, व्यावसायिक, शेगाव