: उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाढली गर्दी
मेहकर : मेहकर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीसदर्भात विविध कागदपत्रे एकत्र करण्यासाठी ग्रामस्थ तहसील कार्यालयात एकच गर्दी करत आहेत. नगर परिषदेच्या मैदानावर दुचाकी-चारचाकी वाहने उभी राहात असल्याने या मैदानाला खासगी वाहन पार्किंग झोनचे रूप प्राप्त झाले आहे.
सार्वत्रिक निवडणुकीद्वारे सन २०२० ते २०२५ दरम्यान गठित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण ७ डिसेंबर रोजी जाहीर झाले हाेते. हे आरक्षण रद्द करण्यात आल्याने अनकेांचा हिरमाेड झाला असला तरी निवडणुकीतील रंगत कायम आहे. मेहकर तालुक्यात एकूण ९८ ग्रामपंचायतींच्या निवडणूक होत असून, त्यात अनुसूचित जातीसाठी २१, अनुसूचित जमातीसाठी ६, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी २६ आणि सर्वसाधारण यासाठी ४५ ग्रामपंचायती राखीव झाल्या आहेत.
अत्यंत चुरशीच्या वातावरणात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील मंडळी मोठ्या प्रमाणावर विविध निवडणुकीसंदर्भात विविध कागदपत्रे जातीचे दाखले व इतर कामासाठी एकच गर्दी करीत आहेत. तालुक्यातून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन येणाऱ्या लोकांना आपापली वाहने उभी करण्यासाठी कोणतीच पार्किंग व्यवस्था नसल्याने नागरिकांनी नगर परिषदसमोर असलेल्या स्वतंत्र मैदानाला वाहन पार्किंग झोन केलेले आहे. त्यामुळे शेकडोंच्या संख्येत या मैदानात उभे असलेल्या वाहनाला एक वेगळेच रूप प्राप्त झालेले आहे. राज्यात कोरोनाविषाणूचे रुग्ण वाढणार असल्याचे संकेत येत असले तरी मात्र या निवडणुकीत कोणतेही नियम पाळल्या जात असल्याचे दिसून येत नाही.