लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कठोर निर्बंधांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सद्वारेही प्रवाशांची बिनदिक्कत वाहतूक होत आहे. प्रवाशांकडे ना ई-पास असते, ना त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारलेले असतात. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सला एकप्रकारे या निर्बंधाच्या काळात मोकळे रान मिळाले असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी मध्यंतरी चार खासगी वाहनांवर कारवाई केली आहे. बुलडाणा पालिकेनेही १८ मे रोजी दोन ट्रॅव्हल्सला दहा हजार रुपयांचा दंड केला आहे. मात्र, याउपरही बुलडाणा जिल्ह्यातून पुणे, सुरत, मुंबईला खासगी प्रवाशी बसगाड्या धावत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण आहे. सध्या मलकापूर-पुणे, सुरत-मेहकर, जळगाव जामोद-पुणे आणि मलकापूर येथून चार खासगी ट्रॅव्हल्स जिल्ह्याबाहेर जात आहेत. त्यामुळे एकप्रकारे या खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या या प्रसंगी सुपरस्प्रेडरची भूमिका निभावत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
बुलडाण्यातील गाड्या बंदबुलडाणा जिल्हा बस असोसिएशन अंतर्गत बुलडाण्यातून आठ ट्रॅव्हल्स पूर्वी धावत होत्या. मात्र ई-पासची समस्या असल्याने सध्या ट्रॅव्हल्स चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे तूर्तास आमच्या गाड्या आम्ही बंद ठेवल्या असल्याचे बुलडाणा जिल्हा बस असोसिएशनचे पदाधिकारी धनंजय भालेराव यांनी सांगितले. असे असले तरी अन्य ठिकाणांहून ट्रॅव्हल्स धावत आहेत.
प्रवाशांकडेही नसते वैद्यकीय प्रमाणपत्रट्रॅव्हल्सद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे ना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट असतो किंवा त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के असतात. त्यातच ३० प्रवाशांचा शासन टॅक्स घेत असले तरी प्रत्यक्षात १५ प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी दिली जाते. त्यामुळेही बऱ्याचदा अनेक ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी दिसून येत आहेत.
ना मास्क, ना सॅनिटायझरसध्या दररोज ८ ट्रॅव्हल्स सुरत, पुणे, मुंबईसाठी धावत आहेत. यातील प्रवाशांकडे ना मास्क असतो, ना बसचालकांकडे सॅनिटायझर असते. प्रवाशांच्या हातावरही क्वारंटाईनचे शिक्के मारले जात नाहीत. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र तर दूरच आहे.
ई-पास कोणाकडेही नाही बुलडाणा जिल्ह्यातून जवळपास ८ ट्रॅव्हल्स धावतात. सुरत व पुण्यावरूनही दोन येतात. या ट्रॅव्हल्सवाल्यांकडे ई-पास नसतो. मुळात बुलडाण्यातून या वाहनांना ई-पासच दिल्या जात नाहीत. मात्र, त्याउपरही या ट्रॅव्हल्स धावत आहेत. कारवाई करण्याची गरज आहे.
पाच ट्रॅव्हल्सवर कारवाईगेल्या आठ ते दहा दिवसांत ५ ट्रॅव्हल्सवर बुलडाणा पालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याव्यतिरिक्त अमडापूर येथेही एका ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली आहे.