खामगाव : स्थानिक नगर पालिकेची १ जून रोजीची तहकूब सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली. या सभेला विरोधी पक्षाच्या सर्वच नगरसेवकांनी दांडी मारली. तर सत्ताधाऱ्यांनी अवघ्या १० मिनीटांत १७ विषयांना मंजुरी देत सभा गाजवली.
शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी नगर पालिकेची सर्वसाधारण सभा १ जून रोजी आयोजित करण्यात आली. मात्र, भाजप नेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनामुळे १ जून रोजीच्या सभेला अध्यक्ष अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय पुरवार अनुपस्थित होते. त्यामुळे हंगामी पिठासीन अधिकाऱ्यांची निवड करण्यात येवून सभा चालविण्यात आली. त्यानंतर आवश्यक गणपूर्तीमुळे १ जून रोजीची तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा शुक्रवारी घेण्यात आली. मात्र, या सभेला विरोधी पक्षाच्या सर्वच नगरसेवकांनी दांडी मारली. काँग्रेसच्या नगरसेवकांसह, राष्ट्रवादी आणि भारिपचे नगरसेवक या सभेला अनुपस्थित होते. उल्लेखनिय म्हणजे, १ जून रोजीच्या सभेचे पिठासीन अधिकारी आणि एक दिवसाचे अध्यक्ष नगरसेवक देवेंद्र देशमुख हे देखील शुक्रवारच्या सभेला अनुपस्थित होते. त्यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी अवघ्या १० मिनीटांत विविध १७ विषयांना मंजुरी देत शुक्रवारची सभा गाजविली. यावेळी सर्व कायदेशीर सोपस्कर सत्ताधाºयांनी पार पाडले. या सभेला पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष अनिता डवरे, उपाध्यक्ष संजयमुन्ना पुरवार, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, नगर अभियंता निरंजन जोशी यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी ठरावाचे वाचन महेंद्र महितकर यांनी केले.
भाऊसाहेब, भैय्यूजी महाराजांना श्रध्दांजली!
पालिकेच्या सभेला सुरूवात झाल्यानंतर वेळेवरील विषयातंर्गत भाजपनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह आध्यात्मिक गुरू भैय्युजी महाराज यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसा ठराव पालिकेत पारीत करण्यात आला.
शहरातील विकास कामांचे विरोधकांना कोणतेही सोयर-सूतक नाही. त्यामुळेच त्यांनी आजच्या सभेला अनुपस्थिती दर्शविली. विरोधकांच्या अनुपस्थितीत नियमांचे तंतोतंत पालन करीत सभेचे कामकाज चालविण्यात आले. लोकनेते भाऊसाहेब फुंडकर आणि संत भय्युजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करण्यास विरोधकांना वेळ नाही!, हा त्यांचा कपाळकरंटेपणाच म्हणावा लागेल.
- अनिता डवरे, नगराध्यक्षा, नगर परिषद, खामगाव.