बुलडाणा : पवित्र पाेर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसइबीसी) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा (इडब्ल्यूएस) लाभ देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांना आपला प्रवर्ग बदलता येणार आहे. त्यासाठी १४ जानेवरीपर्यंत लाॅगिन करून बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षक भरती पुन्हा रखडणार असल्याचे चित्र आहे.
गत दाेन वर्षांपेक्षा जास्त काळापासून पवित्र पाेर्टलवर शिक्षक भरती रखडली आहे. चार हजार ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सहा हजार जागांसाठी भरती रखडल्याने उमेदवार त्रस्त झाले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार उमेदवारांना पवित्र पाेर्टलवर लाॅगिन करून प्रवर्ग बदलता येणार आहे. प्रवर्ग बदलण्याचा निर्णय ऐच्छिक राहाणार आहे. उमेदवाराने या पदभरतीकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आरक्षणाचा लाभ घेतल्यास उमेदवार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही. बदल करण्यासाठी केवळ सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांनाच लॉगिन उपलब्ध होईल. अन्य प्रवर्गातील उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नाही तसेच ही सुविधा उमेदवारांना १४ जानेवारीपर्यंत राहणार आहे. याविषयीची सूचना पवित्र पाेर्टलवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.