खामगाव (बुलढाणा) : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येतो. मात्र, विमा मिळण्याकरिता जाचक अटी असल्यामुळे विम्याचा लाभ मिळण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे नुकसान झाल्यावरही शेतकरी विम्यापासून वंचित राहतात.
जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात मृग आणि आंबिया हे दोन बहार घेण्यात येतात. यापैकी मृग बहाराच्या वेळी संत्र्याला जास्त दर मिळतो. तर यावेळी उत्पादनही अधिक होते. शासनाने पीक विम्याबाबत तीन वर्षांपूर्वी अध्यादेश काढला होता. यातील अटींवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच संत्रा उत्पादक समिती स्थापन केली आहे. संत्रा पीक विमा काढण्याकरिता शेतकऱ्यांना ११ हजार ६०० रुपये भरावे लागतात.
अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे, तसेच पावसाचा खंड पडला तर अनेकदा संत्रा पिकाचे नुकसान होते. मात्र, विम्याच्या अटी कठोर असल्याने भरपाइपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते. आंबिया बहारामध्ये १ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान सलग ७ दिवस ३० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर २० हजार रुपये भरपाइ देण्यात येते. मात्र, या कालावधीत २० किंवा २५ मिमी पाऊस झाला तरीही नुकसान होते. मात्र, भरपाइ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विम्याच्या अटीमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली आहे.पीक विमा मिळण्याकरिता शासनाच्या वतीने जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. नुकसान झाल्यावरही भरपाइ मिळत नाही. शेतकरी पीक विमा काढण्याकरिता ११,६०० रुपये भरतात. मात्र त्यांच्या पैशांचेही नुकसान होते. याबाबत न्याय मागण्याकरिता संत्रा उत्पादक समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी न्यायालयातसुद्धा धाव घेतली आहे.- तुकाराम इंगळे, सचिव संत्रा उत्पादक समिती, सोनाळाकाय आहेत निकष
१५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला तर नुकसानभरपाई ४० हजार रुपये देण्यात येते. तसेच या कालावधीत १२४ ते १५० मिमी पाऊस झाला, तर १२ हजार रुपये देण्यात येते. मात्र या कालावधीत १०० किंवा १२० मिमी पाऊस झाला तरी नुकसान होते व निकषानुसार मदत मिळत नाही. १६ जुलै ते १५ ऑगस्ट यादरम्यान पावसाचा १५ ते २१ दिवसांचा खंड पडून तीन दिवस दिवसाचे जास्तीत जास्त तापमान ३५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास १८ हजार रुपये नुकसानभरपाई मिळते. या कालावधीत सतत २१ दिवस खंड पडला आणि तीन दिवस दिवसाचे तापमान ३५ डिग्रीपेक्षा जास्त राहिले, तर ४० हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. मात्र, या कालावधीत जर १० ते १२ दिवसांचा खंड पडला तरीही संत्र्याचे नुकसान होते. दिवसाचे तापमान ३० डिग्री राहले तरी नुकसान होते. मात्र, शासकीय आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.