खामगाव : निसर्गाच्या अवकृपेने जिल्ह्यात संत्रा पिकाच्या मृग बहार फुटीवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ४८०० रुपये भरून विमा काढला आहे. अटी व नियमानुसार मृग बहाराचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना विमा मिळायला हवा; मात्र अद्याप विमा मिळाला नसून शेतकरी विम्याच्या प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. संग्रामपूर तालुक्यात सोनाळा परिसरात शेकडो हेक्टरवर संत्रा बागांची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून संत्रा बागा उभ्या केल्या आहेत. झाडांचे संगोपन करण्याकरिता दरवर्षी हजारो रुपये खर्च करावे लागतात. विमा मिळण्याकरिता नियमानुसार १५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्यास ४० हजार रुपये देय राहते. १२४ ते १५० मिमी पाऊस झाल्यास १२ हजार रुपये देय राहते. सोनाळा व बावनबीर परिसरात पाऊस कमी पडला व खंडही पडला असल्याने विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मृग बहाराकरिता शेतकऱ्यांनी ४८०० रुपये भरून विमा काढला असून प्रतिहेक्टर ८० हजार रुपये संरक्षित रक्कम आहे. हा विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी विम्याच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपनीने त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
विम्याचे हे आहेत नियमनियमानुसार १५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाल्यास ४० हजार रुपये देय राहते. १२४ ते १५० मिमी पाऊस झाल्यास १२ हजार रुपये देय राहते. तसेच १६ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान १५ ते २१ दिवस पावसाचा खंड पडला आणि यादरम्यान तीन दिवस तापमान ३५ डिग्रीपेक्षा असले तर १८ हजार रूपये भरपाई देय राहते. तसेच २१ दिवसांपेक्षा पावसाचा खंड पडल्यास व सलग तीन दिवस तापमान ३५ डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ४० हजार रुपये भरपाई देय राहील.
मृग बहाराचा विमा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार विमा शेतकऱ्यांना देण्यात येईल. - नितीन सावळेजिल्हा प्रतिनिधी, एआयसी विमा कंपनी
संत्रा उत्पादक शेतकरी प्रतिक्षेत
१५ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याकरिता आम्ही ४८०० रुपये भरून विमा काढला. या काळात संत्र्याच्या मृग बहाराचे नुकसान झाले असून, विमा मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. गतवर्षी डिसेंबर महिन्यात विमा मिळाला होता. यावर्षी मात्र अद्याप मिळाला नाही. - तुकाराम इंगळे, संत्रा उत्पादक शेतकरी