धामणगाव बढे : गावामध्ये वीज वितरणासंदर्भात विविध समस्या असताना व वेळोवेळी त्यासंबंधीची निवेदने देऊनही त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे त्रस्त होऊन ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
धामणगाव बढे येथे कनिष्ठ अभियंत्यांसह वीज कर्मचारी गावांमध्ये हजर राहात नाहीत. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या जीवावर उदार होऊन अनेक वेळा कामे स्वतः करावी लागतात. त्यामुळे वीज कर्मचारी फक्त नागरिकांना धमकावून वीजवसुलीसाठीच आहेत का, असा प्रश्न आता पडला आहे. याबाबत वरिष्ठांना कळवूनसुद्धा कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे फोनसुद्धा वीज कर्मचारी घेत नाहीत. पटेल कब्रस्तानजवळच्या रस्त्यावरील विजेचा खांब तिरपा झालेला आहे. तो कधीही पडू शकतो. त्यामुळे जीवितहानी होऊ शकते. याबाबतची तक्रार करूनसुद्धा येथील कनिष्ठ उपअभियंता त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. भैरवनाथ मंदिराजवळील राेहित्रावर अधिकचा लोड झाल्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार याबाबत संबंधितांना कळविलेले आहे, तरी त्याची दखल घेतली जात नाही. बडा मोहल्ला कब्रस्तानच्या आतमध्ये विद्युततारा तुटून जमिनीवर पडल्या आहेत. एक खांब तिरपा झालेला आहे. याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. गावाच्या समस्यांबाबत तत्काळ दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य ॲड. वसीम कुरेशी, रशीद पटेल, शेख सादीक शेख रशीद, जमीर कुरेशी यांच्यासह नागरिकांनी निवेदनाद्वारे उपोषण व आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळेतसुद्धा निवेदन स्वीकारण्यासाठी येथील कनिष्ठ अभियंत्यासह कोणताही वीज कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे येथील महावितरण कार्यालयाचा कारभार नागरिकांसाठी किती त्रासदायक आहे हे स्पष्ट होते. येथील कनिष्ठ अभियंत्यांसह वीज कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी विविध तक्रारी असतानासुद्धा व अनियमितता असतानासुद्धा वरिष्ठ अधिकारी याची दखल का घेत नाही, हा खरा प्रश्न नागरिकांकडे पडला आहे.