खामगाव (जि. बुलडाणा): कृषिउत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी खामगावच्या उपविभागीय अधिकार्यांना १८ मार्च रोजी दिले. त्यामुळे आता त्वरित प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक मानले जात आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव या संस्थेचा कार्यकाळ संपून तब्बल एक वर्ष पूर्ण झाले आहे. सुरुवातीला अशासकीय प्रशासक मंडळानंतर आता सध्या शासनातर्फे प्रशासक बसले आहे. सदर निवडणूक प्रक्रियामध्ये पंचायत समितीकडून तब्बल अडीच ते तीन महिने ग्रामपंचायतच्या याद्या पाठविण्यात आल्या नव्हत्या. नंतर पाठविलेल्या याद्या चुकीच्या पाठविल्या. ३१ ऑक्टो. २0१४ पासून निवडणूक मतदार यादी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र याद्या तब्बल ६ महिन्याच्या उशीरानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाल्या आहेत. सहकारी सोसायटी मतदार संघातून ११ संचालक ग्रा.पं. म तदार संघातून ४ संचालक, व्यापारी मतदार संघातून २ व हमाल मापारी मतदार संघातून एक असे एकूण १८ संचालक निवडण्यासाठी ही निवडणूक होणार आहे. जवळपास ३000 मतदार ४ मतदार संघात असून सदर निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत आहे. ५ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असल्याने सदर निवडणूक सहकार खात्याच्या अखत्यारित राहिली नसून जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना १८ मार्च रोजी प्रक्रिया सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
खामगाव कृउबास निवडणूक प्रक्रियेबाबत एसडीओंना आदेश
By admin | Published: March 24, 2015 1:06 AM