पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सेंटरमधील प्रत्येक वॉर्डाला भेट दिली. कोविड सेंटरमध्ये असलेली स्वच्छता, निसर्गरम्य व आध्यात्मिक, प्रेरणादायी परिसर, तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच संस्थेमार्फत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिली जाणारी मोफत भोजन, निवास व्यवस्था याबाबत समाधान व्यक्त केले. रुग्णांच्या नातेवाइकांनी कोविड रुग्णालयात गर्दी न करता अंतरावर राहावे म्हणजे कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची काळजी घ्यावी. जिल्ह्याची परिस्थिती सुधारत असली तरी जनतेने लॉकडाऊनचे पालन करावे, मास्क वापरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी त्यांनी महाराजश्रींच्या आठवणींना उजाळा दिला. आश्रमासारख्या इतर सेवाभावी संस्थांनी अधिक कार्यक्षमतेने या परिस्थितीत पुढे येऊन जनतेच्या सेवेसाठी योगदान द्यावे, अशी भावनाही शिंगणे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय वडतकर, डॉ. आशिष चांगाडे, डॉ. गजानन गिऱ्हे, डॉ. भूषण पागोरे, डॉ. नयना चांगाडे, विजय ठोकरे, शिवा कोंडेकर, आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण रुग्णालयाची पाहणी
हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे व प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या सुविधेची डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पाहणी केली. येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच सुविधा उपलब्ध करून येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी डाॅ. शिंगणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.