चिखली : बंडात्यात्या कराडकर व वारकऱ्यांना आळंदी (देवाची) येथे ३ जुलैला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने तीव्र निषेध नोंदविला असून, वारकऱ्यांवरील अन्याय थांबवा, अन्यथा गावागावांतून दिंड्या पंढरपूरला जातील, असा इशारा या पृष्ठभूमीवर वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी दिला आहे.
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना ३ जुलै रोजी आळंदी देवाची येथे पोलिसांनी अटक करून स्टेशनला नेले आहे. या घटनेमुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे ह.भ.प. शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने त्यांनी प्रसिद्धिपत्रक काढले असून, यामध्ये ह.भ.प. कराडकर हे एका चांगल्या हेतूने आळंदीला गेले होते. वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे. 'पंढरीचा वारकरी । वारी चुकू न दे हरी ।।' या संत वचनाप्रमाणे शेकडो वर्षांच्या वारी परंपरेला शासनाने पायबंध घातले आहेत. कोरोनाचे कारण असले तरी वारकरी सर्व नियमांचे पालन करून पायी वारी करायला तयार आहेत. स्वत:च्या जीवित्वाची जबाबदारी स्वत: घेऊन मायबाप पांडुरंगाच्या भेटीला निघत आहेत. तरीसुद्धा पोलीस त्यांना अटक करतात, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोना काळात निवडणूका झाल्या, राजकीय पुढाऱ्यांच्या सभा झाल्या, त्यांना कोणी अडविले नाही आणि अटकही केली नाही. प्रत्येक शहरात तोबा गर्दी आहे. अशी स्थिती असताना केवळ वारीतूनच कोरोना वाढतो का? असा प्रश्न देखील ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी उपस्थित केला आहे. शासन वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ-श्रेष्ठ वारकऱ्यांना अटक करून वारकरी संप्रदायाचा अपमान करत असेल, तर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ कदापि सहन करणार नाही. यापुढे असा प्रकार घडल्यास बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावातून पंढपूरसाठी दिंड्या निघतील. वारकरी संप्रदायाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी दिला आहे.