साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या जागदरी या छोट्याशा गावात कोरोना संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या गावाला कोरोना संसर्गजन्य आजाराने ग्रासले असून आरोग्य यंत्रणेने वेळीच याची दखल घेऊन उपाययोजना करावी, असे आवाहन विष्णू जायभाये यांनी केले आहे .
जागदरी गावाची लोकसंख्या जेमतेम १२०० च्या आसपास असून पहिल्या कोरोना लाटेत एका सेवानिवृत्त शिक्षकांचा मृत्यू झाला होता. त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरली होती. परंतु १५ फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून येत असल्याने स्थानिक नागरिकांनी आपापल्या परीने रुग्ण रुग्णालयात दाखल केले. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढला की, या छोट्याशा गावात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ९ व्यक्ती कोरोना संसर्गजन्य आजाराचे बळी ठरले. एका पाठोपाठ एक कोरोना संक्रमणाने मृत्यू होत असतांना आरोग्य विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. आजही असंख्य नागरिक कोरोनाने त्रस्त असून या रुग्णांची तपासणी करण्यात यावी आणि त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे, अशी मागणी विष्णू जायभाये यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे यांच्याकडे केली आहे़
काेट
जागदरी हे गाव मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असून लवकरच एक टीम पाठवून संपूर्ण गावातील नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
- डॉ. महेंद्र साळवे .
तालुका वैद्यकीय अधिकारी, सिंदखेडराजा