अमडापूर : पावसाने उघाड दिल्यानंतर अमडापूर परिसरात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे़ गत पाच दिवसात अमडापूर प्राथमिक आराेग्य केंद्रात ४४१ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे़ व्हायरल फिव्हरने अनेकांना ग्रासले आहे. माेठ्यांबराेबर लहान मुलांनाही सर्दी, खाेकला, ताप आदी लक्षणे आहेत़ आराेग्य विभागाने या परिसरात उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे़
अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २८ गावे जोडलेली आहेत़ ईसोली, मंगरुळ नवघरे, वरखेड कव्हळा या गावांमध्ये चार उपकेंद्र आहे. परिसरात सध्या सर्दी, ताप, खोकला डेंग्यूसदृश तापाने थैमान घातल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून व ग्रामपंचायतमार्फत उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे़ सध्या पावसाने उघड दिलेले असून, कडाक्याचे ऊन तापत आहे़ महिला, पुरुष, लहान मुलांना व्हायरल फिव्हरने ग्रासले आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील अनेकांना बाधा झाली हाेती. तसेच अनेकांचा मृत्यूही झाला हाेता. काेराेना आणि व्हायरल फिव्हरची लक्षणे सारखीच असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे, आराेग्य विभागाने उपाययाेजना करण्याची गरज आहे़
प्राथमिक आराेग्य केंद्रात वाढतेय गर्दी
गत काही दिवसांपासून अमडापूर प्राथमिक आराेग्य केंद्रात रुग्णांची माेठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे़ पाच दिवसात ४४१ रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले आहेत़ परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये माेठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी वाढली आहे़
आराेग्य विभागाचे ग्रामपंचायतीला पत्र
परिसरात गत काही दिवसांपासून व्हायरल फिव्हरची साथ सुरू असल्याने अमडापूर प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. मनीषा खरात यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे़ तसेच स्वच्छता अभियान राबवण्याचा सल्ला दिला आहे़ गावांमध्ये ज्या भागात पाणी साचते तेथील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे़