देऊळगाव राजा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू असल्याचे चित्र आहे़. त्यामुळे देऊळगाव राजा शहरातील सरकारीबराेबरच खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत़. सर्दी, ताप, खाेकला आदींनी ग्रामस्थ त्रस्त असल्याचे चित्र आहे़
शहरातील, तसेच ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या घटत असताना बदलत्या वातावरणाचा लहान मुलांसह वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. रिमझिम पाऊस, बदलते हवामान यामुळे सर्दी-खोकला-ताप चिकनगुनियासदृश आजाराने डोके वर काढले आहे़. व्हायरल फिव्हर राेखण्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायती, नगरपालिका, महसूल, शिक्षण विभागातर्फे विविध ठिकाणी जाऊन जागृती करण्यात येत आहे़. गत वीस ते पंचवीस दिवसांपासून वातावरणात होणाऱ्या सतत बदलाचा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे़. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, हातापायाच्या सांधेदुखीचा त्रास होत आहे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार ही लक्षणे चिकनगुनियासदृश आजाराचे आहेत़. आजारी असलेल्या रुग्णांनी शहराकडे एकच धाव घेत उपचारासाठी गर्दी केली आहे़. त्यामुळे शहरातील शासकीय बराेबरच खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत़.
रुग्णांना शासकीय रुग्णालयात इलाजासाठी आवाहन करण्यात येत आहे. लक्षणे असलेल्या संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे़. मात्र, खासगी रुग्णालयात विविध चाचण्यांवर हजारो रुपये खर्च करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. त्यात महागड्या औषधाचा खर्च वाढला आहे़.
बदलत्या हवामानामुळे व अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरासह परिसर स्वच्छ ठेवावा. पिण्याचे पाणी उकळून प्यावे़. डासांची उत्पत्ती होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी. खोकला. ताप. सर्दी लक्षणे आढळल्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क करावा़.
दत्ता मांटे, तालुका आरोग्य अधिकारी, देऊळगाव राजा.