लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणाच्या परिसरातील पिंप्री गवळी, काबरखेड, सांगळूदसह लगतच्या काही गावातील कपाशी पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा संशय असून, त्याच्या पाहणीसाठी आता थेट नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे पथक येत्या आठवड्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रामुख्याने या भागातील शेतातील कपाशीची पिके ही खुजी अर्थात बुटकी राहत असून, त्यांची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. सोबतच कपाशीची पानेही चुरगळलेल्या सारखी दिसत आहे. यासोबतच फुल आणि फळधारणाही या कपाशीला होत नसल्याचे पाहणीमध्ये समोर आले आहे. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ सी. पी. जायभाये यांनी कृषी अधिकारी कपील कंकाळ यांच्यासमवेत नुकतीच पिंप्री गवळी भागातील या शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशीही या विषयावर चर्चा केली आहे. मात्र एकंदरीत प्रकार पाहता या रोगाबाबत अद्याप निष्कर्ष काढण्यात आलेला नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालाही याची माहिती देण्यात आली असून, काही नमुनेही त्यांना पाठविण्यात आले आहे. सूत्र कृमी संदर्भात आम्हाला शंका आहे, पण अद्यापपर्यंत आम्ही कुठल्या निष्कर्षापर्यंत आलेलो नाही, असेही जायभाये यांनी सांगितले. गेल्या ८ ते दहा वर्षापूर्वी शेलापूर भागातही काही झाडांवर असा प्रकार दिसला होता, पण आता हे प्रमाण वाढत असल्याचे ते म्हणाले.
झाडाची वाढ होत नाहीहा रोग पडलेल्या झाडाची वाढ होत नाही. खोडही वेडेवाकडे वाढते व झाड बुटके राहते. फुले व बोंडे येथ नाही. पाने पिवळी पडतात तथा पानावर लालसर रंग दिसतो, असे प्रत्यक्ष पाहणीत आढळले असल्याचे डॉ. सी. पी. जायभाये म्हणाले.
नमुने तपासणीस पाठविलेया झाडाचे व त्याच्या आसपासच्या मातीचे नमुने घेण्यात आले असून, ते अकोला कृषी विद्यापीठ आणि नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे पथक पिंप्री गवळी परिसरात पाहणीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ शास्त्र तथा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख सी. पी. जायभाये यांनी दिली.