ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि 9 - अनेक महिलांनी नव-यांच्या खिशातील पैसे घरात लपवून गोळा करून ठेवले आहेत. मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर महिला घाबरल्या असून त्यांनी नव-यांकडेच या नोटा बदलण्यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे घरात दडलेला पैसा आता बाहेर येऊ लागला आहे.
येथील कृषि उत्पन्न बाजार समिती व्यापा-यांनी बंद ठेवल्या होत्या. अचानक बंद ठेवल्यामुळे सर्वच हमाल आणि कामगार बाजार समितीत एकत्र जमले. यावेळी त्यांनी आपापली आपबिती सांगितली. अनेक हमालांच्या पत्नी स्वतः कामावर जातात. पतीला दारु-जुगाराचे व्यसन असल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे या महिला आपल्या पतीला पैसे देत नाहीत.
तसेच पतीने पैशांबाबत विचारणा केल्यानंतर त्या थेट पैसे नसल्याचे सांगतात, मात्र 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्याची अचानक घोषणा होताच या महिला घाबरल्या असून, त्यांनी स्वतः नव-यांना गोळा करुन ठेवलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बाजार समितीत याची बरीच चर्चा रंगली आहे.