मागील वर्षी मे-जून महिन्यांत काही ठिकाणी या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. परंतु भवन, वझर आढावनजीक रेतीघाट सुरू झाल्यामुळे रेतीची रात्रंदिवस वाहतूक सुरू आहे. रात्री मोठमोठ्याने आवाज करत वाहने वेगाने आमराई ते वझर आढावदरम्यान धावताहेत़ या मार्गावर देऊळगाव कुंडपाल, चिंचोली, सांगळे, पार्ड दराडे, येवती व वझर आघाव ही गावे असून क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहतुकीमुळे गावांना जोडणाऱ्या या जिल्हा मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे़ त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. वर्षभरापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते, पण रेतीघाट सुरू झाल्यापासून क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या जिल्हा मार्गाचे डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी डाॅ़ अमोल सरकटे, संदीप राठोड, ज्ञानेश्वर सरकटे, अर्जुन आडे, शिवाजी सरकटे यांनी केली आहे. दरम्यान, आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नामुळे सदर रस्ता मंजूर झाला असून लवकरच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रा़ पं. सदस्य सुनील नरवाडे यांनी दिली़
ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याची झाली चाळण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:37 AM