चिखली : कोरोनामुळे उद्भवलेल्या भयावय परिस्थितीत जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांनी दर्शविलेल्या जागरूकतेने जिल्ह्यात २५ एप्रिलला ऑक्सिजनचे सिलिंडर मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
बुलडाणा जिल्ह्याला लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनची जिल्हा प्रशासनाने मागणीच केलेली नसल्याने जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा होत नव्हता़ ही बाब आ.महाले यांना समजताच त्यांनी जिल्ह्याधिकारी, आयुक्त आणि बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्याचे समन्वयकांकडे तक्रार केल्याने प्रशासनाने वेगाने सूत्रे हलविली. त्यानुसार २५ एप्रिलला जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात ऑक्सिजनचे टँकर दाखल झाले आहेत. जिल्ह्यात दाखल झालेल्या ऑक्सिजन टँकरमधून साठा करून घेतल्यानंतर उरलेले ऑक्सिजन खामगाव, शेगाव येथे पाठविण्यात आले़ तेथील साठवण क्षमतादेखील संपल्याने उरलेला साठा अकोला येथे पाठविण्यात आला. दरम्यान, बुलडाणा शासकीय रूग्णालयातील ऑक्सिजनचा साठा किमान पाच ते सहा दिवस पुरेल असे प्रशासनाने जाहीर केले आहे. दरम्यान, आमदार श्वेता महालेंनी ऑक्सिजन प्रश्नावर जागरूकपणे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासह स्वत: पुढाकार घेत खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरसाठी देखील ऑक्सिजन मिळवून दिले असून त्यांच्या पुढाकाराने आणखी १०७ ऑक्सिजन सिलिंडर मिळणार आहेत. यातील ६० सिलिंडर चिखली तर ४७ सिलिंडर बुलडाणा येथील रुग्णालयास मिळणार आहेत़
पालकमंत्री ना.डॉ. शिंगणेंनी घेतली दखल !
आ.महाले यांच्या मागणीची पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने दखल घेत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले तसेच खासगी व शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या ऑक्सिजन साठ्यासंदर्भात वेळेवर मागणी न करता यासंदर्भात प्रत्येक तहसीलस्तरावर एका सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडून अगोदरच आढावा घेऊन मागणी नोंदवावी, असे आदेश पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेला दिल्याने आता मागणी व पुरवठा यातील तफावत दूर होवून आवश्यकतेनुसार आॅक्सिजनचा पुरवठा होणार आहे.
पंतप्रधान केअर फंडातून हवेतून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा !
बुलडाणा जिल्हा समर्पित कोविड रुग्णालयात पंतप्रधान केअर फंडातून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याची अद्ययावत यंत्रणा बसविण्याचे काम सुरू असून त्या यंत्राची चाचणी घेण्यात येणार आहे. सदरची यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर बुलडाणा येथील आरोग्य यंत्रणेला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा सातत्याने होत राहणार आहे. ही यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐन गरजेच्यावेळी जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यासह यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असल्याने सदर युनिटचे काम खूप कमी दिवसांतच पूर्ण झाले आहे, अशी माहिती आ.श्वेता महाले यांनी दिली आहे़