बुलडाणा: जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने धरण तलाव तुडूंब भरले आहेत. त्यात पद्मावती व करडी धरणाला गळती लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कालव्याच्या भिंतीला तडे गेल्याने पाण्याची गळती होत असून पाटबंधारे विभागाकडून उपाययोजनांच्या हालचाली सुरू आहे.धाड : संततधार पावसाने मागील चार ते पाच वर्षाचा दुष्काळ धुवून काढला असून या भागातील प्रकल्पांना बऱ्यापैकी जलसाठा आल्याने समाधान व्यक्त होत आहे. परंतू या पावसाने येथील करडी धरणाला लागलेली पाण्याची गळती सध्या धोकादायक ठरत आहे.धाड नजीक करडी धरण असून या धरणावर आधारीत परिसरातील किमान ५०० हेक्टरवर शेतजमीन ओलीताखाली येते. तर धाडसह किमान आणखी दहा गावांचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून आहे. १९९६-९७ मध्ये या धरणात प्रथम जलसाठा झाला. यानंतर या धरणाकडे पाटबंधारे विभागाने वळून बघितले नाही. आज या धरणावर अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या एकाच वर्षात उद्भवलेल्या नाहीत. धरणाच्या भिंतीवर अनेक मोठ-मोठी झाडे वाढली आहेत. झुडपांची दाट वस्ती निर्माण झाल्याने या भिंतीस तडा जाण्याची शक्यता वाढली आहे. या धरणाचे सांडव्यावर ३५ स्वयंचलित दरवाजे असून, धरणाचे सांडव्यालगतच्या संरक्षक भिंतीतून पाण्याची मोठी गळती होत आहे. हा प्रकार मागील आठ-नऊ वर्षापासून सुरू आहे. याबाबत नागरिकांनी पाटबंधारे विभागास वारंवार सुचित करुनही अद्यापपावेतो संबंधित विभागाने काहीच कार्यवाही केली नाही. याच धरणाचे भिंतीवर वॉटर लेव्हल ‘वेल’ तयार करण्यात आली. ती भिंतीत लीकेज झाल्याने मागील काही वर्षापुर्वी मातीचा भराव टाकून बंद करण्यात आली. सध्या धरणात साधारण: ६० टक्के जलसाठा झाला आहे. अजून पावसाळा राहिला असून आताच या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा वाहून जात आहे. तर पाण्याची होणारी गळती ही धोकादायक असल्याने धरणाचे खालच्या बाजूस असणाºया साधारण ८-१० गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. मागील दहा वर्षात या धरणाच्या देखभाल दुरुस्तीवर पाटबंधारे विभागाने काहीच उपाययोजना केलेली नाही.
धामणगाव धाड: विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या पद्मावती धरणाच्या कालव्याच्या भिंतीला तडे गेल्याने धरणाला गळती लागली आहे. ही पाणी गळती परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. वालसांवगीसह अन्य गावाला पाणीपुरवठा करणाºया पद्मावती धरणातील जलसाठ्यात वाढ होत असली तरी पाणी सोडण्याच्या कालव्याच्या भिंतीतूनच पाण्याची गळती होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण ढाले आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने येथील पद्मावती धरणातील जलसाठा ८० टक्क्यावर पोहचला आहे. संततधार पाऊस सुरू असल्याचे धरणातील जलपातळी वाढतच आहे. परंतू अशातच धरणांतील पाटाच्या कालव्याच्या भिंतीतून पाणी गळती होत आहे. धरणाच्या पायथ्याशी धामणगाव, पारध, सातगाव म्हसला यासह अन्य गावे येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीगळती झाल्यास या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. धरणाची पाणी साठवण क्षमता आठ दशलक्ष घनमीटर आहे. शिवाय या भिंतीला तडे देखील गेले आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरल्यास जास्तीची पाणी गळती होऊ शकते. शिवाय भिंत फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मोठा अपघातही होऊ शकतो. अगोदरच महाराष्ट्रात तिवरे धरण फुटल्याने अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले होते, त्यातच धामना धरणाच्या भिंतीतुन होत असलेली पाणी गळती आणि त्यापाठोपाठ आता पद्मावती धरणाच्या कालव्याच्या भिंतीतून होणारी गळती धोक्याची घंटा आहे. पाणी गळतीमुळे अनेक नागरिकांनी धरणावर जाऊन पाहणी केली. भविष्यातील उपाययोजना लक्षात घेता धरणाची व पणीगळती थांबविण्यासाठी तातडीने हालचाली करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी दिला आहे.
करडी धरणाला ज्या ठिकाणी गळती आहे, त्याची पाहणी केली. तसा अहवाल वरीष्ठांना पाठविण्यात आला आहे. लवकरच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. पद्मावती धरणातील पाणी जेथून कॅनॉलामध्ये सोडल्या जाते, त्याठिकाणी बाहेरील बाजुने अल्पप्रमाणात गळती होत आहे. यासंदर्भात धरण सुरक्षितता संघटनेचे अधिक्षक अभियंता यांना कल्पना दिली असून, ते येऊन पाहणी करणार आहेत.- ए. एन. कन्ना,कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे मंडळ, बुलडाणा