अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्यास पाेलिसांचे अभय
मुलीच्या वडिलांचे पाेलीस अधीक्षकांना निवेदन
बुलडाणा : अकाेला येथील एका अल्पवयीन मुलीला मेहकर येथील आराेपीने पळवून नेले आहे. या प्रकरणी फिर्याद दिली असता मेहकर पाेलीस आराेपींविरुद्ध कारवाई करीत नसल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पाेलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या प्रकरणी आराेपीला अभय देणाऱ्या पाेलीसांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात केली आहे.
अकाेला शहरातील एक अल्पवयीन मुलगी मेहकर येथे आली हाेती. या मुलीला प्रकाश रामेश्वर मुलचंदानी याने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी मेहकर पाेलिसात तक्रार करून आराेपी मुलासह त्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली. मात्र, मेहकर पाेलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नाही. अल्पवयीन मुलीचे माेबाईल लाेकेशन मिळाल्यावरही पाेलिसांनी तिचा शाेध लावला नाही. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्यावर अत्याचार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मेहकर पाेलिसांना मुलीचा शाेध लावण्याचे आदेश द्यावे, तसेच आराेपीवर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी पाेलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.