अमडापूर : शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याने तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊन अनेकांचे मृत्यू होत असतानाही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत़. त्यामुळे अमडापूर पाेलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे़. या कारवाईतून एका महिन्यात उंद्री व अमडापूर ग्रामपंचायतींनी २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे़.
काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसेच केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी आहे; परंतु जे या आदेशांमध्ये बसत नाहीत, असे दुकानदारसुद्धा दुकाने उघडी ठेवत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी अशा दुकानदारांवर व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. १७ एप्रिल रोजी अमडापूरचे ठाणेदार अमित वानखेडे यांनी विनाकारण दुचाकीवरुन फिरणारे व नियमांचे पालन न करता आपली दुकाने उघडी ठेवणाऱ्या काही दुकानदारांवर कारवाई केली़. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची जबाबदारी समजून मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे़.