नितीन निमकर्र्डे । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागातील सर्वच्या सर्व कर्मचारी एकाच वेळी गायब होत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारा सोमवारी उघडकीस आणले होते. तरीही शुक्रवारी पुन्हा दोन विभागातील सर्व कर्मचारी एकाच वेळी गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक नसून, त्यांची ‘हम नही सुधरेंगे’अशी वृत्ती बनल्याचे दिसून येत आहे.पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागातील सर्वच्या सर्व कर्मचारी एकाचवेळी गायब झाल्याचा प्रकार सोमवार २२ मे रोजी घडला होता. याबाबत फोटोसह वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात प्रकाशित केले, तर शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास बांधकाम विभागास प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता, या विभागात सुद्धा तसाच प्रकार दिसून आला. दाराची कडी बाहेरून लावून सर्वच्या सर्व कर्मचारी गायब झालेले होते. असाच प्रकार अभिलेख विभागात दिसून आला. यासंदर्भात सहायक गटविकास अधिकारी काळपांडे यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण एकाचाही फोन लागत नव्हता. दरम्यान, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता घाटोळ हे निवडणूकविषयक कामाने दौऱ्यावर असल्याचे समजले. पण, अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल समजू शकले नाही. सहायक गटविकास अधिकारी काळपांडे यांच्या कॅबिनला लागूनच असलेल्या अभिलेख विभागाची सुद्धा कडी बाहेरून लावून सर्व कर्मचारी बाहेर निघून गेल्याने त्यांच्यावरही कोणाचे नियंत्रण नसल्याचे म्हणावे लागेल. विशेष म्हणजे सोमवारी पशुसंवर्धन विभागातील सर्व कर्मचारी गायब झाल्याच्या छायाचित्रासह वृत्त ‘लोकमत’ने छापले. त्यावेळी बांधकाम विभागाचे कामकाजही याच विभागातून चालत होते. त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांमध्ये काही खुर्च्या या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्याही होत्या. सदर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बांधकाम विभाग वरच्या मजल्यावर हलविण्यात आला. पण, या विभागालाही बाहेरून कडी लावून सर्वच्या सर्व कर्मचारी गायब झाल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले.सर्वच विभाग पडतात दुपारनंतर ओसप्रस्तुत प्रतिनिधीने शुक्रवारी सर्व विभागात जाऊन पाहणी केली असता शिक्षण, कृषी व सामान्य प्रशासन या विभागातही नाममात्र दोन-तीन कर्मचारी काम करताना दिसून आले. पंचायत समितीमधील बहुतेक सर्वच विभाग दुपारनंतर ओस पडत असल्याचे दिसून येतात. बीडीओ जाताच होतात कर्मचारी पसारशुक्रवारी गटविकास अधिकारी किशोर शिंदे हे दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यालयात हजर होते. शिंदे जाताच कर्मचारीही पसार झाले. त्यामुळे बीडीओ हजर असेपर्यंतच कर्मचारी काम करीत असल्याचे व ते जाताच स्वत:ही पसार होत असल्याचे दिसून येते.उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुरुवारीच घेतला कामकाजाचा आढावाजिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी गुरुवार, २५ मे रोजी पंचायत समितीला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंचायत समितीत कर्मचारी एकाच वेळी गायब होण्याचा हा प्रकार दोन विभागात दिसून आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नसून, कर्मचारी सैराट झालेले आहेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.कर्मचाऱ्यांची सवय बिघडलेली असून, त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे. सर्वच्या सर्व कर्मचारी गायब होतात, हा प्रकार गंभीर असून, या कर्मचाऱ्यांना आपण सोमवारी नोटिस बजावणार आहोत. तसेच कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी लवकरच थम्ब मशीन उपलब्ध करुन देऊ.- काळपांडे, सहायक गटविकास अधिकारी