लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : महाराष्ट्र विधिमंडळाची पंचायत राज समिती एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात येत असून जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाची पाहणी करून जिल्हा परिषदेस ही समिती भेट देणार आहे. यासंदर्भातील पंचायत राज समितीचा कार्यक्रम महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांनी दिला दिला असून ३० सदस्यीय ही समितीमधील किती सदस्य प्रत्यक्षात बुलडाणा जिल्हा परिषदेतंर्गतच्या वार्षिक प्रशासन अहवालाची पाहणी करण्यासाठी येतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी पंचायत राज समिती ही २०१६ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात आली होती. त्यावेळी पंचायत राज समितीने जिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेने केलेल्या कामांची पाहणी केली होती. या समितीचा हा दौरा त्यावेळी चांगलाच चर्चेत राहला होता. दरम्यान, आता पुन्हा चार वर्षांनंतर ही समिती बुलडाणा जिल्हा परिषदेची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, ही समिती २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात जिल्हा परिषदेला भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व तर सर्व संबंधित अधिकारी यांची साक्ष एप्रिल-मे महिन्यादरम्यान घेणार आहे. त्यामुळे संबंधित वर्षाच्या अहवालांच्या किमान पाच प्रती जिल्हा परिषद प्रशासनास तयार ठेवाव्या लागणार आहे.समितीवर कोरोना संसर्गाचे सावटप्राथमिक स्वरुपातील पंचायत राज समितीचा हा दौरा जिल्हा परिषद प्रशासनास प्राप्त झाला असल्याची माहिती आहे. मात्र, कोरोनाची साथ आणि तिचा होत असलेला प्रसार ही बाब विचारात घेऊन आ. डॉ. संजय रायमुलकर हे समिती प्रमुख असलेल्या या पंचायत राज समितीचा हा दौरा होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासनास अहवाल व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे.
एप्रिल-मे महिन्यात पंचायत राज समिती बुलडाण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:37 AM