यंदा एसटीने एकही पालखी नाही!
राज्यभरातून काही मानाच्या पालख्या एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला पोहोचणार आहेत, परंतु बुलडाणा जिल्ह्यातून पंढरपूरसाठी जाणाऱ्या बसेस यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटी बसने वारकऱ्यांना यंदाही पंढरपूरला जाता येणार नाही.
जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या
बुलडाणा जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पालख्या पंढरपूर वारीला जातात. ५० पेक्षा जास्त दिंड्या पंढरपूरला जातात. त्यामध्ये श्री गजानन महाराज शेगाव ही प्रमुख दिंडी आहे. त्यासोबतच वारकरी एसटीने आळंदी, देहू येथे जातात. माउलींच्या सोहळ्याबरोबर वारकरी पंढरपूरला जातात. या पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करतात.
कोरोनाचाही फटका !
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही परिवहन सेवा सुमारे दोन ते अडीच महिने बंद होती. परिणामी, महामंडळाची आर्थिक स्थिती अधिकच खालावली आहे. आता आषाढी वारी रद्द झाल्याने लालपरी आर्थिक संकटात सापडणार आहे.
वारकऱ्यांचेही गावी मन रमेना
आतापर्यंत पंढरपूरच्या दरवर्षी वाऱ्या केल्या आहे, परंतु कोरोनामुळे पंढरपूर यात्राही रद्द करण्यात आल्याने वारी बंद आहे. यंदा घरूनच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
- संतोष महाराज खडसे.
वारी हेच वारकऱ्याचे जीवन आहे. वारी नाही, तर आमचे जीवन शून्य आहे. सरकारच्या नियमांचे आम्ही स्वागत करतो. मात्र, पंढरपूरला जाता नाही आले, तरी शासनाने गावखेड्यातील विठ्ठलाचे एखादे मंदिर खुले करावे.
-संजय महाराज देशमुख.