मेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासनाने विविध योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरु केल्या आहेत. तर प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेसाठी जवळपास २४ हजार अर्ज मेहकर पंचायत समितीला प्राप्त झाले असून, त्यामध्ये खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन ग्रामीण भागात सर्व्हे सुरु आहे. शासनाने इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना सह इरतही योजना सुरु करुन अनेक गोरगरीबांना घरकूल दिलेले आहेत. परंतु या योजनेत ज्यांना घरकूल मिळाले नाही त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी ग्रामीण भागातून प्रत्येक खेडेगावातून जवळपास २४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण २०११ मध्ये जो सर्वे झाला होता त्यानुसार सदर अर्ज घेण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत अर्जदार हा त्याच गावचा रहिवासी असला पाहिजे, तसेच कच्चे घर असावे, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन सध्या प्रत्येक खेडेगावामध्ये सर्वे सुरु आहे. सर्वे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये गटविकास अधिकारी आर.पी.पवार, सदस्य ओमप्रकाश चिखलेकर, विस्तार अधिकारी पंडागळे व एक नायब तहसिलदार तसेच ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, पंचायत समिती कर्मचारी यानुसार ही समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सध्या प्रत्येक खेडेगावात जावून आलेल्या अर्जाची छाणनी करुन घराची पाहणी करीत आहे. खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ देण्यास हा सर्वे सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)
अनेक योजनांचे घरकूल अद्याप अर्धवटच गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासन दरवर्षी घरकूलाच्या विविध योजना काढत आहेत. त्यानुसार संबंधितांचे घरकूल मंजूर करण्यास, अनुदान सुद्धा देण्यात येते. मात्र इंदिरा आवास योजना शबरी आवास योजना, रमाई आवास योजना या योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून घरकुले मंजूर झाली आहेत. परंतु अद्यापही अनेक गावातील घरकूल अर्धवट स्थितीत आहेत. शौचालय बांधकाम नाही. शासन या घरकूलावर कोट्यावधी रुपये खर्च करीत असताना केवळ पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक, शाखा विस्तार अधिकारी, अभियंता यांच्या निष्काळजीमुळे शासनाचा मुळ उद्देश सफल होतांना दिसत नाही. मागील विविध योजनेचे घरकुल अर्धवट असतांना प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले पूर्ण होतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.