- विवेक चांदूरकरखामगाव : श्री क्षेत्र वरोडी ते श्री क्षेत्र शेगाव या परमहंस श्री तेजस्वी महाराज संस्थानतर्फे आयोजित पायी दिंडी सोहळ्याला २३ ऑगस्ट रोजी वरोडी येथून सुरूवात झाली. २८ ऑगस्ट रोजी शेगाव येथे पालखी पोहोचली. पालखीचा रविवारी रात्री खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुक्काम होता. सोमवारी सकाळी पालखीने शेगावकडे प्रस्थान केले. सायंकाळी पालखी शेगावला पोहोचली.
परमहंस श्री तेजस्वी महाराज संस्थानच्या या दिंडीमध्ये १,५०० वारकरी सहभागी झाले आहेत. त्यापैकी १५० झेंडेकरी व १५० टाळकरी आहेत. पालखीमध्ये सतत गाथा भजन सुरू असते. श्रींची पालखी, श्रींचा अश्व पालखीसोबत आहे. पालखीचे मेहकर, जानेफळ, दे. साकर्शा, अटाळी, खामगाव, शेगाव असे सहा मुक्काम झाले. दररोज सायंकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. सोमवारी पालखी शेगावला पोहोचली.
पालखीत ९ टॅंकरव्दारे पाण्याची व्यवस्थादिंडीमध्ये पिण्याच्या पाण्याकरिता ९ टँकर उपलब्ध आहेत. विहीर किंवा बोअरवेलचा सतत वापर चालू आहे. तसेच पाणी वापरण्यात येते त्या विहिरींचे पाणी टॅंकरमध्ये भरण्यात येते. तसेच पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी विशेष औषधांचा वापर करण्यात येतो. या दिंडीसोबत वारकऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी वैद्यकीय वाहन व अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका सेवेत आहे. तसेच वारकऱ्यांना काही त्रास झाल्यास त्वरित उपचार करण्यात येतात.
स्वच्छता व्यवस्थेसाठी विशेष व्यवस्थादिंडीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. दिंडी मार्ग स्वच्छतेसाठी ५० सेवाधाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी काही कार्यकर्ते दिंडीसमोर व काही कार्यकर्ते दिंडीच्या पाठीमागे सतत स्वच्छता करत असतात. पायी वारीदरम्यान अनेकजण चहा व फराळाचे वाटप करतात. दिंडी गेल्यानंतर चहाचे कप व प्लेटासाफ करण्याकरिता विशेष व्यवस्था असून, नियमित स्वच्छता करण्यात येते.
वाहतूक व सुरक्षा व्यवस्थावारकऱ्यांचे साहित्य, संस्थेची साधनसामुग्री व इतर साहित्य वाहतुकीसाठी १०१ वाहनांचा ताफा सोबत आहे. दिंडी मार्गामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये व दिंडीची शिस्त अबाधित राहावी, याकरिता ९ सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. सुरक्षारक्षक विशेष गणवेशात आहेत. सोबतच त्यांना काही विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.