- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : राज्यातील ३३ नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी २ हजार ६४० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र नवोदय परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर दिसत नाहीत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले याची माहिती सुद्धा उपलब्ध नाही. परीक्षार्थींची गुणवत्ता यादी स्पष्ट होत नसल्याने पालक नवोदय विद्यालयाच्या गुणांकनाविषयी संभ्रमात पडले आहेत.इयत्ता सहावी ते १२ वीपर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा असलेल्या नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी इयत्ता पाचवीमध्ये नवोदयची परीक्षा घेण्यात येते. यावर्षी इयत्ता सहावीपासून मोफत प्रवेश मिळविण्यासाठी २१ एप्रिल २०१८ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल सर्वत्र जाहीर झाला आहे. सहावी इयत्तेसाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड केली आहे, त्या विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून वर्ग नियमितपणे सुरू करण्याच्या सूचना जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांना देण्यात आलेल्या आहेत. एका विद्यालयात ८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत असून एकूण ३३ विद्यालयांमध्ये २ हजार ६४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. परंतू ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचे गुण संकेतस्थळावर देण्यात आलेले नाहीत. जवाहर नवोदय विद्यालयात निवड होण्यासाठी पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली; यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र परीक्षेला बसलेल्या कुठल्याच विद्यार्थ्यांचे गुण यामध्ये दिसून येत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.गुण दर्शविणे आवश्यकएका जिल्ह्याची ८० विद्यार्थ्यांची यादी नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावर घोषीत करण्यात आली आहे. मात्र, इतर विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती त्यांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आपल्याला किती गूण मिळाले हे पाहण्याची सुविधा सुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत नाही. दरवर्षी केवळ निवड झालेल्या विद्यार्थ्यांचीच यादी प्रकाशीत करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.