लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शाळा बंद झाल्या आहेत. अनेक शाळकरी मुले घरी असून, कुटुंबातील सदस्य मास्कच्या वापरासह इतर सूचनांचे पालन करतात का, याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता, बहुतांश पालक बाहेर जाताना मास्क वापरत असल्याचे सांगण्यात आले.
जे पालक मास्कसह इतर सूचनांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना मास्क वापरण्याबाबत ही मुले आठवण करून देत आहेत. जिल्ह्यात दिवसाकाठी तीनशेपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या तब्बल १७ हजार ९७९ वर गेली आहे; तर, त्यांतील १९२ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील उपचारांनंतर १५ हजार २५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना लसीकरण सुरू असले, तरी सर्वसामान्यांना लस मिळण्यासाठी मोठा विलंब होणार आहे. लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होणार आहेत. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, हात धुणे या उपाययोजना आपल्याला कोरोनापासून दूर ठेवणार आहेत. हीच बाब मध्यंतरी शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी सांगितली होती. घरातील सदस्यही याबाबत चर्चा करीत असल्याने आम्हाला या उपाययोजनांची माहिती झाली. त्यामुळे बाहेर जाताना आम्ही मास्क घालतो, घरी आल्यानंतर हात धुतो. तसेच असे न करणाऱ्यांना त्याची आठवण करून देताे, असेही मुलांनी सांगितले.
स्वत:ची काळजी घ्या आणि आईबाबांचीही काळजी घ्या!
प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का? मास्क वापरले का, हेही पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
शाळा बंद असल्याने मी मामाच्या घरी आले आहे. माझे वडील हिवरा आश्रम येथे किराणा दुकान चालवितात. तेव्हा मी वडिलांना रोज फोन करून विचारते की, मास्क घातला की नाही? त्यांना नियमांचे पालन करण्याची आठवण करून देते.
आयेशा परवीन सलीम शाह
आई-बाबा बाहेर जात असताना त्यांना सतत मास्क घालण्यासाठी आठवण करून देतो. मास्क घालण्याची विनंती करतो. घरी आल्यावर हात-पाय स्वच्छ साबणाने धुवायला सांगतो. शाळेमध्ये काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याविषयी सूचना मिळाल्या आहेत.
कृष्णा गाभणे, डोणगाव
मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव कमी झाला होता. त्यामुळे मास्कचा विसर पडला होता; परंतु आता परत कोरोना वाढल्याने कुटुंबासह मी बाहेर जाताना आवर्जून मास्क वापरतो. घरी आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुतो व इतरांना मास्क घालण्यास सांगतो.
ओम मगर, देऊळगाव माळी
शहरांसह ग्रामीण भागांत काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भीती वाटत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावण्याविषयी आई व वडिलांना आठवण करून देताे. तसेच बाहेरून घरी आल्यानंतर हात धुण्याविषयी सांगताे.
- ऋषिकेश जगन्नाथ ठाले