चिखली : विकासकामे पूर्ण हाेण्यापूर्वीच चिखली नगरपालिकेने कंत्राटदारांचे देयके दिल्याची तक्रार नागरिकांनी जिल्हाधिकारी व शासनाकडे हाेती़ या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे़ ही समिती स्थापन हाेताच अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात येत आहेत़ या गैरप्रकारात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे़
चिखली शहरातील संभाजीनगरमधील संत सेना भवनासह दहा ते बारा भूखंडाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे; परंतु त्याची बिले अगोदरच काढण्यात आली आहेत़ या प्रकरणी अनेक तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाने चाैकशी समिती स्थापन केली आहे़ या समितीने पंचनामेदेखील केले आहे़ या समितीने पाहणी करण्यापूर्वीच अगोदर न लावलेले दिवे लावण्यात आले आहेत़ संत सेना महाराज भवन येथे स्ट्रॉबेरी झाडे लावण्याचा विक्रमदेखील नगरपालिका प्रशासनाच्या ठेकेदाराने लेखी दिले आहेत़ प्रत्यक्षात येथे स्ट्रॉबेरीचे एकही झाड लावण्यात आलेले नाही़ जिजाऊ उद्यानात एका रात्री दिवे लावण्यात आल्यामुळे हा भाग प्रकाशमय झाला़ या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे, राणा चंदन व कार्यकर्त्यांनी शासनाकडे केली आहे़