-----
कोरोना काळात होळी साजरी न करण्याचे आवाहन
मोताळा : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा झपाट्याने प्रसार होत आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी होळी आणि रंगपंचमी घरीच साजरी करावी, असे आवाहन जाणता राजा युवक मंच शेलापूरच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------
एसटी बसमध्ये कोविड नियमांचे उल्लंंघन
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असतानाच, एसटी महामंडळाच्या अनेक बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. एसटीला ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत, बुलडाणा आगाराच्या बसेसमध्ये कोविड नियमांची पायमल्ली केली जात आहे.
----
होलिका दहनाचे मुहूर्त जाहीर
बुलडाणा : हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होलिका दहनासाठी बुलडाणा जिल्हा पुरोहित संघाच्या वतीने मुहूर्त जाहीर करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतर होलिका दहन करण्याचे आवाहन अजय महाराज पुरोहित यांनी केले आहे. सायंकाळी ६ वाजण्यापूर्वीचे होलिका दहन वर्ज्य मानण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
---
शेलापूर येथे शहिदांना अभिवादन
मोताळा: तालुक्यातील शेलापूर येथे शनिवारी शहिदांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या ९०व्या बलिदान दिवसानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतिवीर युवक मंचाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------
विमा प्रतिनिधींचे निवेदन
बुलडाणा : एलआयसी पॉलिसी डायरेक्ट मार्केटिंग, ऑनलाइन विमा विक्रीवरील रिबेट बंद करण्याच्या निषेधार्थ विमा प्रतिनिधींनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन सादर केले. २३ मार्च रोजी कामबंद आंदोलन केल्यानंतर २५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
----
कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
मोताळा : तालुक्यात कोरोना लसीकरण अतिशय संथगतीने सुरू आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मोताळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड लसीकरण सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामधन चिम गुरूजी यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
------------
जनावरे चोरी करणारी टोळी सक्रिय
उंद्री : गत काही दिवसांपासून महागड्या कारमधून जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. परिसरातील शेतशिवारातून बकऱ्या, तसेच गोऱ्हे चोरीस जाण्याच्या घटनांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
-----
वीजजोडणी न कापण्याचे आवाहन
भादोला : बुलडाणा तालुक्यातील भादोला येथील शेतकऱ्यांची वीज जोडणी न कापण्याचे आवाहन महावितरणकडे करण्यात आले. कोरोना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस आलेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज जोडणी कापणे योग्य ठरणार नसल्याचे संदीप पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
----------
जागतिक क्षयरोग दिन साजरा
बुलडाणा : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी क्षयरोग आणि क्षयरोगग्रस्त रुग्णांना मिळणाऱ्या सवलतींबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.
-----------
पीक नुकसानीचे सर्वेक्षण करा!
मोताळा: तालुक्यातील ग्रामीण भागात गत आठवड्यात अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले. हजारो हेक्टरवारील गहू, हरभरा, कांदा, केळी पिकाचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाची पाहणी करण्याची मागणी विनोद लांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या निवेदनातून केली आहे.
----
कोरोनाचा अहवाल लवकर द्यावा!
बुलडाणा: कोरोनाच्या अहवालास विलंब न करता, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तत्काळ पुरावा द्यावा, अशी मागणी खामगाव नगरपालिकेचे आरोग्य सभापती ओम शर्मा यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदन सादर केले.
---
किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
मोताळा: तालुक्यातील सावित्रीबाई फुले संस्थेकडून किशोरवयीन मुलींच्या समस्यांबाबत ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत डॉ.आशा शेगोकार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला ७२ किशोरवयीन मुलींनी उपस्थिती दर्शविली.
---------------