बुलडाणा : कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेलेे एसटी महामंडळ आता उत्पन्नवाढीसाठी नवनवीन उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये कोरोनाच्या पृष्ठभूमीवर ॲंटी मायक्रोबीन कोटिंग (विषाणूरोधक लेअर) केलेल्या बसेस सातही आगारांतून धावणार आहेत. २७० बसेसचे उद्दिष्ट असलेल्या बुलडाणा विभागातील १८० बसेसचे कोटिंग पूर्ण झाले असून, लवकरच उर्वरित बसेस कोटिंग केल्या जाणार आहेत.
जग पालटून टाकलेल्या कोरोना विषाणूमुळे प्रत्येक क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. यामध्ये एसटी महामंडळाचाही समावेश आहे. प्रवासी वाढ झाली तर पाहिजेच, सोबतच त्या प्रवाशांचा कोरोना विषाणूपासून बचावही व्हायला पाहिजे यासाठी महामंडळाने उपलब्ध असलेल्या बसेसमध्ये विषाणूरोधक लेअर बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे कोरोनासारखा विषाणू बसमध्ये शिरणार नाही, सोबतच प्रवासी आणि वाहक-चालकांच्या आरोग्याची सुरक्षितता वाढणार आहे. या उपक्रमाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.
वर्षातून सहा वेळा केले जाणार कोटिंग
विभाग नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एसटीला वर्षातून सहावेळा ॲंटी मायक्रोबीन कोटिंग केले जाणार आहे. एकावेळी केलेली कोटिंग दोन महिने टिकते. त्यामुळे प्रवासी हात लावतील त्या ठिकाणी विषाणूरोधक लेअर लावण्यात येणार आहे. म्हणजे सीट, लगेज कॅरिअर आणि इतर जागा कोटिंग केल्या जाणार आहेत.
एका बसला १४९८ रुपये येतो खर्च
एका बसला ॲंटी मायक्रोबीन कोटिंग करण्यासाठी एकावेळी १४९८ रुपये खर्च येतो. वर्षातून सहा वेळा कोटिंग करावी लागणार असल्याने एका बसला वर्षाला ९ हजार रुपये खर्च केवळ कोटिंगचा येणार आहे. तेव्हा जिल्ह्यातील सात आगारांच्या २७० बसेसचे उद्दिष्ट असलेल्या बसेसला वर्षाला कोटिंगसाठी २४ लाख ३० हजार एवढा खर्च येणार आहे.
अशा झाल्या बसेस कोटिंग
आगार कोटिंग झालेल्या बसेस
खामगाव ३०
शेगाव ३०
मलकापूर ३०
जळगाव जामोद ३०
मेहकर ६०
कोटिंग बाकी असलेल्या बसेस
बुलडाणा ६०
चिखली ३०
प्रवाशांनी आता कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता एसटीने प्रवास करावा. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून महामंडळाने बसेस कोटिंग केल्या आहेत. यामुळे विषाणू पसरण्यास अडथळा निर्माण होईल.
-संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा