ब्रम्हानंद जाधव/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 15 - लोणारवरून बुलडाणा मार्गे भूसावळ व जळगाव जाणाऱ्या बसची वायरींग अचानक जळाल्याने बस बंद पडल्याचा प्रकार मेहकर-चिखली रोडवर हिवरा आश्रमपासून २ कि़मी. अंतरावर १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडला. प्रवाशांना एसटीला धक्का द्यावा लागल्याने कुडकुडणाऱ्या थंडीत प्रवाश्यांचा घाम निघाला; मात्र एसटी चालू न झाल्याने
सर्व प्रवाशांना रस्त्यावर उतरावे लागले.
जिल्ह्यातील एसटीला ‘दे धक्का’ म्हणण्याची वेळ वाहकासह प्रवाश्यांवर वारंवार येत आहे. भंगार एसटीबसेचे प्रमाण वाढले असून त्या बसेस सर्रास रस्त्यावर धावत असल्याने प्रवाश्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ‘उशिरा जाईन पण एस.टी. नेच जाईन’ असे म्हणणाऱ्या प्रवाश्यांची संख्या आजही मोठ्या प्रमाणावर असल्याने भंगार एसटीतूनही लांबचा प्रवास प्रवाशी करतात. निवृत्तीच्या मार्गावर आलेल्या एसटी बसेस ग्रामीण भागातच नाहीतर माहामार्गावर सुद्धा पाठवल्या जात आहेत. त्यामुळे मध्येच एसटी बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. मेहकर आगाराची एम.एच.४० एन.८७९३ क्रमांकाची एसटीबस सकाळी ९ वाजता लोणारवरून जळगावसाठी निघाली. ही बस लोणार, मेहकर, लव्हाळा, चिखली, बुलडाणा, मुक्ताईनगर, भूसावळ त्यांनतर जळगाव पोहचणार होती. लांबपल्याची एसटी बस असतांनाही त्याची वायरींग तपासण्याची तसदी घेतली जात नसल्याने लोणार -जळगाव जाणारी एसटीबसची वायरींग हिवरा आश्रमपासून दोन कि.मी. अंतरावर जळून गेली. अचानक वायरींग जळाल्याने एसटी बंद पडली. तेंव्हा चालकांनी प्रवाश्यांना एसटीला धक्का देऊन एसटी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. एसटीला धक्का देत असतांना एसटी तर सुरू झाली नाही; मात्र कुडकुडणाºया थंडीत एसटीला धक्का देणाऱ्या प्रवाशांचा चांगलाचा घाम निघाला. तेव्हा चालक व वाहकांनी सर्व प्रकार मेहकर आगाराला कळविला. कित्येक प्रवाश्यांना महत्वाच्या कामासाठी पुढे जायचे होते, मात्र एक तास दुसरी बस आली नसल्याने २५ ते ३० प्रवाश्यांना रस्त्यावरच ताटकळत बसावे लागले. एक तासानंतर दुसरी बस प्रवाशांनी फुल्ल होऊन आली असता, त्या बसमध्ये प्रवाशांना कोंबून देण्यात आले. रस्त्यावरच अशा प्रकारचे एसटी बस वारंवार बंद पडण्याचे पकार घडत असल्याने प्रवाश्यांना एसटीचा प्रवास डोकेदु:खी ठरत आहे.
भंगार बसेसचे प्रमाण वाढले
जिल्ह्यातील एसटी महामंडळाकडे भंगार एसटी बसेसचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातच नाही तर लांब पल्यावर सुद्धा भंगार एसटी बसेस सोडण्यात येत असल्याने बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. भंगार बसेसमुळे प्रवाशांसाठी बसचा प्रवास डोकेदुखी ठरत आहेत. तर काही ठिकाणी अचानक बसफेरी बंद केली जात असल्याने बस प्रवाश्यांची तारांबळ उडत आहे. राज्य परिवहन महामंडळान्या नियोजनशुन्य कारभाराचा प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे.