बुलडाणा : नोकरी, शिक्षण, पर्यटन अशा विविध कारणांसाठी परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे बुलडाण्यातील नागरिकांमध्ये पासपोर्ट काढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यात पोलिसांकडे पासपोर्ट पडताळणीचे २३९७ अर्ज दाखल झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत या अर्जात काही प्रमाणात घट झाली आहे एवढे मात्र खरे.
परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पासपोर्ट विभागाकडे अर्जाचे प्रमाण वाढत आहे. परदेशात नोकरी करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी हे पासपोर्ट कार्यालयात अर्ज करतात. तर ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून परदेशी पर्यटनाला आकर्षक सवलती दिल्या जातात. त्यामुळे उन्हाळ्यातील सुट्टी, ख्रिसमस, दिवाळीच्या सुट्टीत परदेशी पर्यटनासाठी पासपोर्ट काढून ठेवला जातो. तर हज यात्रेसाठी पासपोर्ट काढले जातात. पासपोर्ट कार्यालयात अर्ज केल्यानंतर व्यक्तीचे पासपोर्ट पडताळणी (व्हेरिफेशन)साठी अर्ज पोलिसांकडे येत असतात. त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी ही व्यक्तीचे घराचा पत्ता व इतर माहिती घेऊन पडताळणी करत असतात. आधी शहरी भागातून पासपोर्ट व्हेरिफेकशनसाठी अर्ज येत होते. आता ग्रामीण भागातून पासपोर्ट पडताळणीसाठी अर्ज येत आहे. आता तर हे काम ऑनलाइन झाले आहे.
खोट्या साईटवर होऊ शकते फसवणूक
तुम्हाला जर पासपोर्ट बनवायचा असेल तर पासपोर्ट विभागाची www.passportindia.gov.in ही अधिकृत वेबसाइट आहे. या वेबसाइटवर अर्ज केला तर तुम्हाला खराखुरा म्हणजेच अधिकृत पासपोर्ट मिळू शकतो. पण सध्या काही बनावट वेबसाइट्सही तुम्हाला पासपोर्ट मिळवून देण्याचा दावा करत आहेत. अशा वेबसाइट्सपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
असे काढले पासपोर्ट
महिना संख्या
जानेवारी ३९९
फेब्रुवारी ४८९
मार्च २५०
एप्रिल १४८
मे २६
जून १३५
जुलै ३०३
ऑगस्ट ५२३
सप्टेंबर १२४
ही लागतात पासपोर्टसाठी कागदपत्रे
रहिवासी दाखला, फोटो प्रूफ, जन्माचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे आदी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आणि १५०० रुपये फी भरून तुम्हाला पासपोर्ट मिळू शकतो. मात्र, तुमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसावा अशी अट यामध्ये आहे.