अंढेरा : घटस्फाेट देण्यास पत्नीने नकार दिल्याने तिचे आक्षेपार्ह पाेस्टर सार्वजनिक ठिकाणी लावल्याचा धक्कादायक प्रकार देऊळगावराजा तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंढेरा पाेलीसांनी आराेपी पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील एकाचा विवाह अंचरवाडी येथील एका मुलीबराेबर झाला. ताे पत्नीला संशयावरून शारीरिक व मानसिक त्रास देत हाेता. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे आराेपीने पत्नीस घटस्फाेट देण्याची मागणी केली. नकार देताच त्याने पत्नीचे आक्षेपार्ह पाेस्टर सार्वजनिक ठिकाणी लावले. तसेच त्यावर माेबाईल क्रमांकही दिला. याबद्दल विवाहितेच्या भावाने त्याला जाब विचारला असता जोपर्यंत घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत एसटी, बस, रेल्वे स्टेशन, सगळीकडे फोटो लावून बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली. या विकृत व्यक्तीने जर घटस्फोट दिला नाही, तर पत्नीच्या बहिणीचे आणि सासूचेही पोस्टर्स लावून त्यांची बदनामी करेन, अशी धमकी दिली. या प्रकरणी विवाहितेच्या भावाने अंढेरा पाेलिसात तक्रार दिली. विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून अंढेरा पाेलिसांनी आराेपी पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद केली आहे.