- सोहम घाडगेलोकमत न्यूज नेटवर्कजगण्यासाठी आवश्यक आॅक्सिजन झाडे मोफत देतात. पाणी, जमीन, सूर्यप्रकाश निसर्गानेच मानवासाठी विनामुल्य उपलब्ध केलेला आहे. पूर्वीचे मानव कंदमुळे, फळे खाऊनच जगायचे. मांसाहार मानवी शरीरासाठी नाही. शाकाहार हाच आपला आहार आहे, असे मत 'आहार ते आरोग्य नवीन भोजन प्रणाली'चे जनक पूणे येथील महेेंद्र पालेशा यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले.
आहार ते आरोग्य नवीन भोजन प्रणाली ही काय संकल्पना आहे?आहार ते आरोग्य नवीन भोजन प्रणालीचा आधार रामचरित्र मानस आहे. राम १४ वर्षे वनवासात होते. तिथे त्यांनी फळे, कंदमुळे खाल्ली. कधी ते आजारी पडल्याचा उल्लेख कुठे आढळत नाही. निसर्गाने आपल्यासाठी बनविलेले खाद्य खायला पाहिजे. आपण देवाला मानतो. मग देवाने बनविलेले खाद्य का खात नाही, हाच मोठा प्रश्न आहे.
जेवणाचे आदर्श वेळापत्रक कसे असावे?पूर्वी विज नव्हती. सूर्यप्रकाश हाच सर्वात मोठा स्त्रोत होता. सूर्योदयोनंतर कामे सुरु व्हायची. साधारणपणे सकाळी १० वाजता व रात्री सहा ही जेवणाची वेळ होती. याचा अर्थ सूर्यप्रकाशानंतर व सुर्यास्ताआधी जेवण केले पाहिजे. दोन जेवणात आठ तासांचे अंतर असावे. त्यामुळे पचनसंस्थेस आपले काम करायला पुरेसा वेळ मिळतो. भूक लागली तेंव्हा जेवण करा. शंभर टक्के भूक लागली तर ९० टक्के जेवा.
आजारासाठी आपला आहार जबाबदार असतो का?हो, आजाराचा मार्ग हा आहारातून जातो. आपण काय खातो यावर आपले आरोग्य जबाबदार असते. आपण एकदा जेवलो की लगेच पून्हा जेवत नाही. मात्र कुणी म्हटलं की आयस्क्रिम, गुलाबजामून खातो. कारण त्यामध्ये साखर असते. साखर हे व्यसन आहे. ते आपणास गोड खायला परावृत्त करते. जसे आपण खाणार तसे आरोग्य आपणास लाभेल. त्यामुळे काय खावे, काय खावू नये हे ज्याचे त्याने ठरवावे. मी मार्ग दाखवू शकतो. त्या मार्गाने जायचे की नाही हे तुम्ही ठरवा. एक वेळ जेवतो तो योगी, दोन वेळ खातो तो भोगी व तीन वेळ खातो तो रोगी असे आपले शास्त्र सांगते. आता यापैकी तुम्हाला नेमके काय स्वीकारायचे ते तुम्ही ठरवा. पूर्वीही जेवण्याच्या दोनच वेळा होत्या. इंग्रज आले आणि त्यांनी ब्रेकफास्ट आणला. त्यातून आपले जीवन ब्रेक केले, असे म्हणता येईल.
जेवणाचे प्रमाण किती असावे ?कुणी किती खावे हे त्याच्या शरीर प्रकियेवर अवलंबून आहे. तुमच्या शरिराला जेवढे खाता येईल तेवढे खा. मात्र दोन जेवणात आठ तास अंतर असू द्या. शाकाहारी जेवण करा. मांसाहार करणे टाळा. शरीराची कार्यपद्धती वाहनासारखीच आहे. पेट्रोलचे वाहन डिझेलवर चालत नाही. आपल्या शरिराची गाडी शाकाहारी इंधनावर चालते. मग आपण का त्यामध्ये मांसाहारी इंधन भरतो. शरिराच्या गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग केली तर गॅरेजरुपी दवाखान्यात जायचे काम पडणार नाही. मेंटनन्स कमी लागेल. पर्यायाने खर्च कमी होईल. नेहमी आजारी पडाल तर नेहमी डॉक्टरकडे जावे लागेल. व्यावसायिक असल्याने तो त्याप्रमाणे बिल लावेल. त्यासाठी आजार दूर ठेवायचा प्रयत्न करा.