मेहकर : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती व कृषी पंपाचे वीज बिले तातडीने माफ करावीत, सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, तालुक्यातील शेतकऱ्यांचा सरसकट पीक विमा मंजूर करून खात्यावर जमा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी नागपूर - औरंगाबाद राज्य महामार्ग रोखण्यात आला. या वेळी सदर राज्य महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तब्बल एक तास रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात करण्यात आला. मेहकर बायपास येथे नागपूर- औरंगाबाद राज्य महामार्गावर आंदोलनाच्या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत सरकारचा व ऊर्जामंत्र्यांचा निषेध केला. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर टाले म्हणाले की, आम्ही गेल्या वर्षापासून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करा, अशी मागणी करत आहोत. मात्र राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे, असा आराेप डॉ. टाले यांनी केला. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली. सदर आंदोलनाला यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोरकर, तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, पक्षाचे ता. अध्यक्ष नितीन अग्रवाल, शहर अध्यक्ष अशफाक शहा, अल्प. आ. उपाध्यक्ष अफरोज भाई, अरुण मुधळकर, गौतम सदावर्ते, कैलास ऊतपुरे, गोपाल सुरडकर, अस्लम शहा, उत्तम खरात, गणेश धाबे, अरुण नागरिक, चंद्रकांत नागरिक, विशाल नागरिक, अनिल ठोकळ, शे. जायद, शे. इनायत युसूफ पठाण, सनाउल्ला खान, गणेश फयाज शहा, मोरे, राकिब बागवान, राहील अन्सारी, शेषराव जाधव, भीमराव खरात, प्रवीण ऊतपुरे, आकाश खरात आदी उपस्थित होते.
मेहकरात स्वाभिमानीचे रास्ता राेकाे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:34 AM