एकंदरीत बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक अशा कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात १ लाख ६४ हजार संदिग्धांच्या जिल्ह्यात कोरोना चाचण्या झाल्या होता. त्या तुलनेत गेल्या दीड महिन्यात विक्रमी अशा १ लाख ७७ हजार संदिग्धांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याअखेर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८४ टक्क्यांवर घसरले होते. ते एप्रिल महिन्याच्या मध्यावर ४ टक्क्यांनी वाढून ८८ टक्के झाले आहे. त्यावरून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा डाऊनफॉल सुरू झाला की काय असा कयासही व्यक्त केला जात आहे.
--मृत्युदरही घसरला--
वरकरणी बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात १२३ जणांचा मृत्यू झाल्याचे दिसत असले तरी मार्च महिन्याच्या प्रारंभी बुलडाणा जिल्ह्याचा मृत्युदर हा १.०४ टक्के होता तो १४ एप्रिल रोजी ०.६४ टक्क्यांवर आला आहे. हीपण जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणावी लागले.
--एक वर्षात १३ टक्के नागरिकांच्या चाचण्या--
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ९३८ संदिग्धांच्या अर्थात १३ टक्के नागरिकांच्या आतापर्यंत चाचण्या झाल्या आहेत. त्यातील निम्म्या चाचण्या या गेल्या दीड महिन्यात झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग वाढल्याचे स्पष्ट होत आहे. यात आरटीपीसीआरच्या सर्वाधिक १ लाख ६३ हजार १५० चाचण्या आहेत. त्यानंतर रॅपिड टेस्टची संख्या १ लाख ६३ हजार १५० आहे तर ट्रुनॅटच्या ११ हजार ९५९ चाचण्या झाल्या आहेत.