लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : येथे डेंग्युग्रस्त महिला रुग्ण आढळल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक भयग्रस्त झाले आहेत. या बाबतीत आरोग्य विभाग अनभिज्ञ असून, विविध साथीच्या आजाराच्या रुग्णांची अजूनही संबंधित कर्मचारी यांनी दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा उभा राहीला आहे.हिवरा आश्रम गावाची लोकसंख्या जवळपास पाच हजारापर्यंत असून येथे विवेकानंद आश्रमाच्या संस्थेचे अनेक विद्यार्थी निवासी आहेत. गावातही अनेक महत्वाच्या ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. गावात कचराकुंडीची व्यवस्था नसल्याने नागरिक घरातील कचरा हा रस्त्यालगतच्या टाकत असल्याने घाणीचे साम्राज्य वाढत आहे. यातूनच जलजन्य तसेच इतरही आजाराचे प्रमाण वाढत आहे. या घाणीसंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तथा आरोग्य विभाग ह्यांनी कुठलीही तजविज केलेली नाही. गावातील नागरिकांना या घाणीसंदर्भात कुठलेही प्रबोधन करण्यात आलेले नाही. दरम्यान संगिता वसंतराव हिवाळे या महिलेस डेंग्यू आजाराची लागण झाली होती. त्या येथील दवाखान्यात उपचाराकरीता दाखल झाल्या असता त्यांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यु सदृश्य ताप असल्याचे निदर्शनास आले, त्यांच्यावर यादृष्टीने उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. तरी स्थानिक आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांनी स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे असून, याकरीता नागरिकांनाही त्यांना स्वच्छतेसाठी पुढाकार घेणे क्रमप्राप्त झाले आहे.
सदर रुग्णाला डेंग्यूसदृश ताप असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घराभोवती व घरामध्ये घाण पाणी साचून ठेवू नये. त्याचप्रमाणे घर डास व घाणीपासून स्वच्छ ठेवावे.-डॉ.महेश अनिल रोकडे, हिवराआश्रम.-