दिवसभर ढगाळ वातावरण
बुलडाणा : शहरात २५ जुलै रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांची परिस्थिती आता समाधानकारक आहे.
१८ जणांचे छत्र हरपले
बुलडाणा : ज्या वयात लहान मुलांना आई-वडिलांचे प्रेम आवश्यक असते, त्याच वयात आई- वडिलांना गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कोरोनाकाळात १८ बालकांनी आपल्या आई- वडिलांना गमवावे लागले आहे.
एसटी महामंडळाची महाकार्गो सेवा
बुलडाणा : राज्य शासनाने एसटी महामंडळास माल वाहतुकीची परवानगी दिली आहे. या सेवेचा नामकरण महाकार्गो करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या महाकार्गो सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी केले आहे.
पीकविम्याचीही प्रतीक्षा
सिंदखेड राजा : तालुक्यामध्ये २०१८ पासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. त्यामुळे पीकविमा भरावा की नाही, अशी उदासीनता शेतकऱ्यांच्या मनामध्ये विमा कंपन्यांबद्दल झालेली आहे. परिणामी, यंदा अनेक शेतकऱ्यांना पीकविमा काढला नाही.
हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल
मेहकर : ११ महिन्यांत चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या हळद पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा हळद पीक घेतले आहे. हळद लागवड १५ जूनपेक्षा उशिरा झाल्यास उत्पादनात घट येते.
पीककर्ज वाटप मेळाव्याचा विसर
लोणार : जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून महसूल विभाग व सहकार विभागाच्या विद्यमाने दरवर्षी कृषी कर्जवाटप मेळावा घेण्यात येतो. मात्र, यंदा कोरोनामुळे पीककर्ज वाटप मेळाव्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. कर्जवाटपाबाबत शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा या मेळाव्यातून घेणे गरजेचे आहे.