सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्वपक्षाच्या सरकारवरील धोरणावर टीकेची झोड उठवून सध्या चर्चेत असलेले भाजपाचे खासदार नाना पटोले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. जवळपास एक तास झालेल्या उभय नेत्यांमधील बंदद्वार चर्चेत लवकरच सोयाबीन, कापूस व धान उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन उभे करण्यासाठी व्यूहरचना झाल्याचे समजते. पूर्व विदर्भात खा. पटोले हे धान उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. तर पश्चिम विदर्भात सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नावर लढणारा नेता अशी रविकांत तुपकर यांची ओळख आहे. औद्योगिक परिसरात आयोजित एका कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांनी बंदद्वार चर्चा केली. या भेटीत शेतकर्यांच्या अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती असून, लवकरच दोन्ही नेते विदर्भात सरकारविरोधात रण माजविण्याचे संकेत या बंदद्वार बैठकीतून मिळत आहेत. कोल्हापूर येथे खा. पटोले यांनी खा. राजू शेट्टी यांच्या २0 नोव्हेंबरला होणार्या मोर्चात सहभागी होण्याचे म्हटले होते. त्या पृष्ठभूमीवर ही बैठक महत्त्वाची समजली जाते.कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होती.
राजकीय भूकंपाची शक्यताभाजपवर नाराज असलेले खा. नाना पटोले सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. दुसरीकडे शेतकर्यांच्या प्रश्नावर लाल दिव्याला लाथाडून आपल्या पदाचा राजीनामा देणारे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी नुकताच संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला आहे. दरम्यान, हे दोन्ही आक्रमक शेतकरी नेते एकत्र आल्यास विदर्भातील राजकारणास कलाटणी मिळेल, असेही बोलले जाते.
सरकारवर टीकेची झोडखा. पटोले व तुपकर या कार्यक्रमानिमित्त प्रथमच एकत्र आले. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी सोयाबीन, कापूस व धान उत्पादक शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशोधडीला लागल्याचा आरोप केला. नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय घेऊन शेतकरी, सामान्य जनतेचे जगणे मुश्कील केल्याची टीकाही त्यांनी केली. -