- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : थकीत मालमत्ता व पाणीकराच्या वसुलीसाठी राष्ट्रीय लोकअदालतचा प्रयोग राबविण्यात आला. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीमधील १२ हजार थकीत कराची प्रकरणे पंचायत विभागाने दाखल केली होती. शनिवार ८ रोजी झालेल्या लोकअदालतमध्ये थकीत कराचा भरणा करण्यासाठी कर खातेदार सरसावले आणि चक्क ७ लाख १० हजाराची वसुली झाली.राष्ट्रीय लोकअदालत राज्यात प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी तालुकास्तरावर आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतमध्ये प्रकरण आपसात मिटविण्यासाठी मालमत्ता व पाणी कर थकीत असलेले कर खातेदार कराच्या भरणा करण्यासाठी सरसावले असल्याचे दृष्य पहावयास मिळाले. थकीत मालमत्ता व पाणी कर वसुलीअभावी अनेक गावांचा विकास खोळंबलेला दिसून येतो. पंचायत समितीच्या अंतर्गत ग्रामपंचायती मार्फत थकीत कर धारकांसाठी गावात दवंडी देवून नोटीस पाठविली जाते. परंतु थकीत करधारकांकडून पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने काही ग्रामंपचायतींची मालमत्ता व पाणी कराची वसुली ही ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. जळगाव जामोद पंचायत विभागाच्यावतीने यामध्ये १२ हजार प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी जळगाव न्यायालयाच्या परिसरात तडजोडीतून थकीत कराचा भरणा करण्यासाठी थकीत करधारकांची मोठी उपस्थिती दिसून आली. करधारकांनी चक्क ७ लाख १० हजाराचा थकीत कराचा भरणा करून काही प्रकरणे नस्ती निघाली. सदर राष्ट्रीय लोकअदालतकरीता १४ पॅनल व २ पंच नियुक्त करण्यात आले होते. त्यावर अॅड.मारोडे, अॅड.काकडे, अॅड.चांडक, अॅड.राजपूत, अॅड.वाघ, अॅड. वानखडे, अॅड.खेर्डेकर, अॅड.इंगळे, उंबरकर, अॅड.मोहम्मद इरफान, अॅड.शाकीर, अॅड.मोहसीन, अॅड.पांडे, मुंडोकार, मनसुटे यांनी काम पाहिले. तसेच या अदालतीच्या यशस्वीतेसाठी एपीआय चव्हाण, न्यायालयीन कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
लोकअदालतीमध्ये ७३४ प्रकरणांचा निपटाराराष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा यांच्या आदेशान्वये जळगाव जामोद तालुका विधी सेवा समितीच्यावतीने दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिवाणी व फौजदारी यांची ९ प्रकरणांचा तसेच दाखलपूर्व ७२५ अशा एकुण ७३४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. आपसात तडजोडीने निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये १७ लाख २४ हजार २५४ रूपयांची वसुली करण्यात आली. यावेळी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्ष न्यायाधीश बी.एस. पाल, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.एस.एस. वानखडे यांचेसह वकील संघाचे सदस्य, बँकांचे शाखा व्यवस्थापक, ग्रामसेवक, पंचायत विस्तार अधिकारी संदीप मोरे यांची उपस्थिती होती.