बुलडाणा : अयोध्दा निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. कुठेही अनुचित प्रकार घडला नसून सर्वत्र शांतता दिसून आली. जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ स्वत: परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शनिवारी बहुचर्चित अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर केला. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठलाही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात दोन अपर पोलिस अधीक्षकांनी विविध ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. सकाळी निकाल जाहीर होताच नागरिकांनी निकालाचे स्वागत केले असून शांतता कायम आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकाºयांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत. बंदोबस्तासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. .
कडेकोट बंदोबस्त तैनात
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे. १ एसआरपीएफ प्लाटून, ५ आरपीसी प्लाटून, १ क्यूआरटी प्लाटून, १ हजार ३०० होमगार्ड, ३१ स्ट्रायकिंग फोर्स, एलसीबी, डीएसबी यांच्यासह पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. कुठल्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी शांतता बाळगावी असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
संवेदनशिल ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त
जिल्ह्यातील संवेदनशिल ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चिखली, धाड, खामगाव, मलकापूर येथे डीवायएसपी दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी जिल्ह्यात २१ शांतता समितीच्या बैठका घेऊन त्यामाध्यमातून नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.