बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असून दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना याचा सर्वाधिक धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर दुर्धर आजार असणाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट सध्या १२ टक्के आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी दोन टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात आले होते. त्यावेळी २६ लाख ८५ हजार नागरिकांपैकी २५ लाख २३ हजार ७४७ नागरिकांमध्ये प्रत्यक्षात जिल्हा प्रशासन पोहोचले होते व त्यांची आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली होती. अर्थात एकूण लोकसंख्येच्या ९६ टक्के लोकापर्यंत आरोग्य विभाग पोहोचला होता व त्यांनी कोरोना संसर्गासंदर्भात प्रत्यक्ष भेटीद्वारे जनजागृती केली होती, असा दावाही आरोग्य विभागाचा आहे. जिल्ह्यात असलेल्या ५ लाख ४८ हजार ५०८ घरांपैकी ५ लाख ४५हजार ६८७ घरांना आरोग्य पथकांनी भेटी देवून घारातील दुर्धर आजार असणाऱ्यांची माहितीही संकलीत केली होती. त्यामध्ये जिल्ह्यात ५६ हजार १२४ व्यक्तींना दुर्धर आजार असल्याचे समोर आले होते. या व्यतिरिक्त आणखी काही व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यास त्यांनी पुढे येवून कोरोना चाचणी करावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. सांगळे यांनी केले आहे.