शेगाव (जि. बुलडाणा), दि. १७: प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायदंडाधिकार्यांविरोधात वकिलांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे १३ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या लोक अदालतीत एकाही प्रकरणाचा निपटारा झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येथील न्यायदंडाधिकारी शाह यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयाकडे वकिलांनी लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शाह यांच्याकडून ज्येष्ठ वकिलांचा वेळोवेळी होणार्या अपमानासह विविध बाबी तक्रारीत नमूद करण्यात आल्या आहेत. शेगाव येथील वकील मंडळींनी शाह यांच्याच एका न्यायालयात काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाच्या वृत्ताला जिल्हा न्यायालयाच्या अधीक्षक कार्यालयाने दुजोरा दिला असून, वकिलांकडून दोन तक्रारी प्राप्त झाल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच वकिलांच्या तक्रारीची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आल्याबाबतही अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. शेगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी आ.मो. शाह यांच्या विरोधात येथील वकिलांनी कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. १३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कलम १३८ ची ७0 प्रकरणे पॅनलसमोर ठेवण्यात आली होती. या पॅनलच्या प्रमुखपदी आ.मो. शाह, सरकारी पंच के.बी. देशपांडे आणि हेमंत पवार यांची उपस्थिती होती. मात्र या लोक अदालतीमध्ये वकील वर्गांनी हजेरीच लावली नाही.
लोक अदालतीची ७0 प्रकरणे निकालाविना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2016 12:51 AM